Asian Para Games : भारताच्या अरुणा तन्वरला तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक!

Asian Para Games : भारताच्या अरुणा तन्वरला तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Para Games : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने आपल्या मोहिमेची धमाकेदार सुरुवात केली. सोमवारी (दि. 23) भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह 17 पदके जिंकली आहेत. प्राची यादवने भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने कॅनोई VL2 स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पदकांचा पाऊस पडला.

अरुणा तन्वरला तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक

आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारताने पदक जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. अरुणा तन्वरने महिलांच्या तायक्वांदो K44-47 किलो गटात कांस्यपदक जिंकले. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. तिने निकराच्या लढतीत चिनी प्रतिस्पर्धी चेन टोंगचा 13-12 असा पराभव करून पदकावर मोहोर उमटवली.

प्रवीण कुमारची सुवर्ण उडी!

भारताच्या प्रवीण कुमारने सोमवारी चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 2.02 मीटर उंच उडी मारून आपल्या नावावर विक्रम नोंदवला. दरम्यान, उन्नी रेणूने 1.95 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले.

प्रणव सुरमाचा सुवर्ण थ्रो!

प्रणव सुरमाने ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या क्लब थ्रो एफ51 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील रौप्य आणि कांस्यपदकांवरही भारतीय खेळाडूंनी मोहोर उमटवली. सुरमाने 30.01मी. थ्रो करून नवा विक्रम प्रस्थापित केला, तर धरमबीर (28.76मी) आणि अमित कुमार (26.93मी) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत फक्त चार स्पर्धक होते. सौदी अरेबियाचा राधी अली अलार्थी 23.77 मीटर फेक करून शेवटच्या स्थानावर राहिला.

वयाच्या 16 व्या वर्षी सुरमाला अपघात झाला ज्यात त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. यामुळे त्याला अर्धांगवायू झाला. यानंतर त्याने पॅरा स्पोर्ट्समध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला. 29 वर्षीय खेळाडूने 2019 बीजिंग वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेतही रौप्य पदक जिंकले होते. F51 क्लब थ्रो इव्हेंट अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या कंबर, पाय आणि हातांच्या हालचालींवर लक्षणीय परिणाम होतो. यामध्ये स्पर्धक बसून स्पर्धा खेळतात आणि खांद्यावर आणि हाताच्या ताकदीवर अवलंबून असतात.

उंच उडीत भारताला तिन्ही पदके, पण…

पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारातही तीन भारतीयांनी अव्वल तीनमध्ये स्थान मिळविले. या संपूर्ण स्पर्धेत केवळ तीन खेळाडूंचा समावेश होता जे भारतीय होते. त्यामुळे तिन्ही पदके जिंकण्यासाठी किमान चार खेळाडू मैदानात असणे आवश्यक आहे, या आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या (APC) नियमांनुसार भारताला कांस्य पदक मिळू शकले नाही. या स्पर्धेत शैलेश कुमारने 1.82 मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदकाची कमाई केली. तर मरियप्पन थांगावेलू (1.80 मीटर) याने रौप्य पदक जिंकले. गोविंदभाई रामसिंगभाई पडियार (1.78 मी) एपीसी नियमांनुसार कांस्य पदकापासून वंचित राहिला. थांगवेलूने यापूर्वी 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी T42 प्रकारात सुवर्णपदक आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये T63 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.

निषाद कुमारचे पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात सुवर्णपदक

निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात 2.02 मीटरच्या प्रयत्नात भारताला दिवसातील तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. तर भारताच्याच राम पालने 1.94 मीटरच्या प्रयत्नाने कांस्यपदकावर नाव कोरले.

शॉटपुट एफ11 स्पर्धेत कांस्यपदक

मोनू घंगासने पुरुषांच्या शॉटपुट एफ11 स्पर्धेत 12.33 मीटरच्या प्रयत्नात कांस्यपदक जिंकले.

महिला कॅनोइंगमध्ये प्राचीची रौप्य कामगिरी

महिला कॅनोइंग स्पर्धेत प्राची यादवने 1:03.147 वेळेसह रौप्य पदक जिंकले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news