Asian Games IND vs AFG Final : ‘एशियन’ क्रिकेटमध्‍ये टीम इंडियाच ‘भारी’, सुवर्णपदकावर ‘स्‍वारी’

Asian Games IND vs AFG Final : ‘एशियन’ क्रिकेटमध्‍ये टीम इंडियाच ‘भारी’, सुवर्णपदकावर ‘स्‍वारी’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई स्‍पर्धेतील क्रिकेटमध्‍ये पुरुष संघाने आज  सुवर्णपदक पटकावले.  अफगाणिस्‍तान विरुद्धच्‍या अंतिम सामन्‍यात १८ षटकांच्‍या खेळानंतर पावसामुळे व्‍यतत्‍य आला. सामना पूर्ण झाला नाही. अखेर टीम इंडियाचे टी-20 मधील आयसीसी रँकिंगमुळे सुवर्णपदक जाहीर करण्‍यात आले. या घाेषणेमुळे भारताने या स्‍पर्धेत २७ व्‍या सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्‍पर्धेत क्रिकेटमध्‍ये टीम इंडियाच्‍या महिला आणि पुरुष  दोन्‍ही संघांनी सुवर्णपदक पटकावले आहे. ( Asian Games IND vs AFG Final )

या स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत भारताने बांगलादेशचा तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Asian Games IND vs AFG Final )

अफगाणिस्‍तानची सुरुवात खराब, सलग तीन धक्‍के

शिवम दुबेने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने पाच धावांवर खेळणार्‍या सलामीवीर झुबैद अकबरीला बाद केले. यानंतर अर्शदीप सिंगने अफगाणिस्तानला दुसरा धक्का देत मोहम्मद शहजादला यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले. अफगाणिस्तानला तिसरा धक्का नूर अली जद्रानच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अली धावबाद झाला. ( Asian Games IND vs AFG Final )

एकीकडे डावाची पडझड होत असताना शहिदुल्ला कमाल आणि अफसर झाझई यांच्‍या भागीदारीमुळे अफगाणिस्‍तानचा धावफलक हलता राहिला. रवी बिश्नोईने दहाव्या षटकात अफसर झाझाईला क्‍लिन बोल्‍ड करत अफगाणिस्‍तानची ही जोडी फोडली. अफशरने २०चेंडूत १५ धावा केल्या. यानंतर शाहबाज अहमदने ११व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जानतला क्लीन बोल्ड केले.५३ धावांवर अफगाणिस्‍तानचा निम्‍मा संघ तंबूत गेला.

Asian Games IND vs AFG Final : कमालची दमदार फलंदाजी

एकीकडे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकत असतानाला अफगाणिस्‍तानचा शहिदुल्‍ला कमाल याने एकहाती लढा दिला. त्‍याने शाहबाजच्‍या १३ व्‍या षटकात एक षटकार आणि चौकार फटकावत भारतावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला. गुलबदिन नायबने त्‍याला भक्‍कम साथ दिली. या जोडीने भागीदारीमुळे अफगाणिस्‍तानने १०० धावांचा टप्‍पा पार केला. ( Asian Games IND vs AFG Final )

पावसामुळे सामन्‍यात आला व्‍यत्‍यय, टी-20 मधील रँकिंगमुळे भारताला सुवर्णपदक

१८ षटकांचा खेळ झाल्‍यानंतर षटकावेळी पावसामुळे सामन्‍यात व्‍यत्‍यय आला. सामना थांबला तेव्हा अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 5 विकेट गमावत 112 धावा केल्या होत्या. शाहीदुल्ला कमाल 49 आणि गुलबदिन नायब नाबाद 27 धावांवर खेळत होते. अखेर पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही. टीम इंडियाला टी-20 मध्ये आयसीसी रँकिंगमुळे सुवर्णपदक जाहीर करण्‍यात आले तर अफगाणिस्‍तान संघाला रौप्‍यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय संघ : रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, आर साई किशोर, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.

अफगाणिस्‍तान संघ : सेदीकुल्लाह अटल, मोहम्मद शहजाद, नूर अली जद्रान, शाहिदुल्ला, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदिन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कायस अहमद, फरीद अहमद आणि जहिर खान.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news