Asian Games Hockey : भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक! द. कोरियाला 1-1 बरोबरी रोखले

Asian Games Hockey : भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक! द. कोरियाला 1-1 बरोबरी रोखले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Hockey : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकी सांघिक स्पर्धेत रविवारी (1 ऑक्टोबर) भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळवण्यात आलेला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या निकालानंतर टीम इंडियाचे तीन सामन्यांत सात गुण झाले आणि त्यांनी आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. यासह भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले आहे. कोरियाचेही तीन सामन्यांनंतर सात गुण झाले होते, पण गोल फरकाच्या जोरावर भारताने बाजी मारली. भारताचा गट फेरीतील शेवटचा सामना हाँगकाँग विरुद्ध आहे.

कोरियाने सामन्यात सुरवातीला आघाडी घेतली. 12व्या मिनिटाला चो येजिनने पेनल्टी स्ट्रोकवर पहिला गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पहिला गोल करण्यात यश आले. दीप ग्रेस ईक्काने 44व्या मिनिटाला गोल डागला. याचबरोबर भारताने सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यानंतर सामन्यात एकही गोल झाला नाही.

सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या क्वार्टरच्या 10व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी मैदानी गोल करण्याची संधी निर्माण केली, मात्र ते चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवण्यात अपयशी ठरले. त्यानंतर द. कोरियाने कौंटर ॲटॅक केला. आणि चेंडू भारतीय डीमध्ये आणला. अशातच 12 व्या मिनिटाला द. कोरियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ज्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अडचण आली नाही. अशाप्रकारे त्यांनी सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली.

सामन्याच्या 22व्या मिनिटाला भारताने फील्ड शॉट गोलपोस्टमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, पण मध्येच दक्षिण कोरियाचा खेळाडू आल्याने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले. सामन्याच्या पुढच्या वेळेत दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु दोन्ही संघांच्या उत्कृष्ट बचावानंतरही एकाही संघाला गोल करता आला नाही. अशाप्रकारे पूर्वार्धाच्या अखेरपर्यंत दक्षिण कोरियाने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आणि भारतीय संघाला एकही गोल करण्यात यश आले नाही.

पूर्वार्धानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमकपणे सामन्याला सुरुवात करून अधिक काळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला आणि याचदरम्यान भारताने 44व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. यासह सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली गेली. भारतासाठी नवनीत कौरने हा गोल केला.

भारतीय खेळाडूंनी तिसरा क्वार्टर अतिशय हुशारीने संपवला आणि आपला बचाव अतिशय भक्कमपणे केला. चौथा आणि शेवटचा क्वार्टर दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता. या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघ गोलच्या शोधात दिसले, मात्र एकाही संघाला यश मिळाले नाही. अशा प्रकारे भारत विरुद्ध दक्षिण कोरिया सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. भारतीय महिला संघ आता आपला पुढील सामना मंगळवारी हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news