हाँगझोऊ; वृत्तसंस्था : चीनमधील हाँगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 19 व्या आवृत्तीला शनिवारी भव्य उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. यात 40 विविध खेळांमध्ये आशियातील 45 देशांतील 12 हजार प्रतिभावान खेळाडू सहभागी होत आहेत. 19 सप्टेंबरला जरी काही क्रीडा स्पर्धा आधीच सुरू झाल्या असल्या, तरी 23 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेला उद्घाटन सोहळ्याने अधिकृतपणे सुरुवात झाली. (Asian Games 2023)
आशियाई खेळ दर चार वर्षांनी एकदाच होतात. मागील आशियाई क्रीडा स्पर्धा या इंडोनेशियातील पालेमबर्ग जकार्ता येथे 2018 मध्ये झाल्या होत्या. चीनमध्ये होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये होणार होत्या; परंतु कोरोना महामारीमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. या स्पर्धेने चीन आपण कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडल्याचे दाखवून देत आहे.
आशियाई खेळ 2023 चा उद्घाटन सोहळा हाँगझोऊ ऑलिम्पिक स्पोर्टस् सेंटर स्टेडियमवर झाला. या स्टेडियमचे काम 2018 मध्ये पूर्ण झाले, सुमारे 80,000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे. उद्घाटन समारंभ व्यतिरिक्त, या स्टेडियममध्ये आगामी फुटबॉल सामने आयोजित केले जातील.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात चिनी संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. नेत्रदीपक रोषणाई आणि इलेक्ट्रॉनिक फटाके यांनी आसमंत उजळून गेला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील हा पहिला डिजिटल प्रज्वलन सोहळा ठरला. आशियाई क्रीडा 2023 च्या उद्घाटन समारंभाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील उपस्थित होते.
2023 आशियाई खेळांमध्ये सहभागी होणारे खेळाडू 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. भारताने आशियाई खेळांसाठी 655 खेळाडू पाठवले असून, 39 खेळांमध्ये भाग घेतला आहे. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लव्हलिना बोर्गोहाईन हे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक होते.
आशियाई क्रीडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्टस् नेटवर्क चॅनलवर भारतात थेट प्रसारित होणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव अॅपवर असेल.
हेही वाचा :