पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशिया क्रीडा स्पर्धेत आज (दि. 3) मंगळवारी भारताची धावपटू पारूल चौधरीने इतिहास रचला. तिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीच्य जोरावर भारताच्या खात्यात 14 वे सुवर्णपदक जमा झाले असून एकूण पदकांची संख्या 64 पर्यंत पोहचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
दरम्यान, पारुल चौधरीचे हे सलग दुसरे पदक आहे. काल सोमवारी तिने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मैदान गाजवले होते. तिने 9 मिनिटे 27.63 सेकंदांची वेळ घेत रौप्यपदक पटकावले होते तर याच स्पर्धेत भारताच्या प्रिती लांबाने (वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते.
विद्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. तिने 55.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले. बहरीनच्या अदेकोयाने 54.45 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी चीनच्या जियादी मोने 55.01 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. भारताचे हे 63 वे पदक ठरले.