महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रासाठी आशियाई विकास बॅंकेचे ५०० दशलक्ष डॉलर्सचे अर्थसहाय्य

ADB
ADB

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार माफक दरात मिळावे, यासाठीची क्षमता वाढविण्यासाठी ५०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेनंतर आशियाई विकास बँकेचे (ADB) तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहे.

आशियाई विकास बँकेचे आरोग्य तज्ज्ञ निशांत जैन यांनी आज एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसाठी कर्जमंजुरीची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, २०२३ पर्यंत सर्वांसाठी परवडणारी आणि उच्च प्रतीची आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी तसेच दर्जेदार वैद्यकीय व्यावसायिकांचे केडर वाढविण्यासाठी आशियायी विकास बँक महाराष्ट्र सरकारसोबत काम करत आहे.

या अर्थसहाय्यामुळे राज्यात उच्च श्रेणीच्या आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी मदत मिळणार आहे. या अंतर्गत राज्यात चार नवीन वैद्यकीय महाविद्यालये, उच्च श्रेणीची उपचार सुविधा असणाऱ्या रुग्णालयांची उभारणी केली जाईल. याखेरीज राज्यातील रुग्णालयांमध्ये खाटांची क्षमता वाढवण्याचे आणि नव्या रुग्णालयासाठी किमान ५०० डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्स वर ट्विट करून आशियाई विकास बँक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. या कर्ज मंजुरीचा फायदा राज्यातील आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी होणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news