नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणार्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक (Asia Cup Tournament) स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी, अशी मागणी केली. यावर पाकिस्तानचा जळफळाट झाला. त्यांनी मग भारतात होणार्या वर्ल्डकपवर आपण बहिष्कार टाकू, अशी धमकी दिली. यापुढे जाऊन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनूस खान याने भारत आला नाही तरी आशिया चषक पाकिस्तानमध्येच घ्यावा, अशी मागणी केली आहे. तर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने काहीही झाले तर पाकिस्तान भारतात खेळेल, असे म्हटले आहे.
भारत नसला तरी आशिया चषक पाकमध्ये व्हायला हवा : युनूस खान (Asia Cup Tournament)
युनूस खानने जय शहा यांच्यावर टीका करताना म्हटले की, 'जय शहा हे केवळ बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षदेखील आहेत. पीसीबीने बीसीसीआयला जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवे. आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात खेळवली गेली पाहिजे.
भारताने या स्पर्धेत सहभाग नाही घेतला तरी ही स्पर्धा पाकिस्तानात व्हायला हवी.' पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्ध एकही सामना खेळू नये, असे एका कार्यक्रमात बोलताना युनूस खान म्हणाला. मला वाटते की जय शहा यांनी असे बोलायला नको होते, पण आता गोळी झाडलीच आहे तर मी पीसीबीला याविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा सल्ला देईन. जे या आधी आपण केले होते तेच करायला हवे. तटस्थ ठिकाणी आशिया चषकाची स्पर्धा आयोजित करण्यास सहमती देऊ नये, असे युनूस खानने म्हटले आहे.
लिहून देतो पाकिस्तान भारतात नक्की येईल : आकाश चोप्रा
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रानेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आशियाई संघटनेकडून एक रुपयादेखील घेत नाही. उलट भारत इतर बोर्डांना पैसे देतो. त्यामुळे मी लिहून देतो की भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही, उलट आता बहिष्काराची धमकी देत असला तरी पाकिस्तान भारतात 2023 वर्ल्डकप खेळायला नक्की येईल, असेही तो म्हणाला.
भारत नसेल तर आशिया चषकाची स्पर्धा होणार नाही ती बंद करावी लागेल. आयसीसीच्या तुलनेत आशिया चषक लहान आहे. पाकिस्तान भारतात होणार्या विश्वचषकात आला नाही तर त्यांना परवडणार नाही, त्यांचे मोठे नुकसान होईल. कारण आयसीसीकडून त्यांना मिळणारे पैसे दिले जाणार नाहीत, असे परखड मत आकाश चोप्राने मांडले.