Asia Cup 2023 Final : सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

Asia Cup 2023 Final : सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’
Published on
Updated on

कोलंबो, वृत्तसंस्था : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम (Asia Cup 2023 Final) सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवत आशिया खंडात क्रिकेटमध्ये आपणच 'किंग' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 10 विकेटस् राखून श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. 1984 मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेत 10 गडी राखून विजय मिळवला होता.

भारतासमोर तगडे लक्ष्य उभे करण्याच्या निश्चयाने प्रथम फलंदाजीचा निर्णय श्रीलंकेने घेतला खरा, परंतु मोहम्मद सिराजच्या निर्दयी मार्‍यासमोर ते ढेपाळले. सिराजचा स्पेल इतका जळजळीत होता की, त्याने एका षटकात 4 विकेटस्, तर 16 चेंडूंत 5 विकेटस् घेतल्या. कर्णधार रोहित शर्मानेही त्याचा गोलंदाजीचा स्पेल कायम ठेवला अन् श्रीलंकेच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची रांग लावली. सामन्यात सिराजने 7 षटके 1 निर्धाव, 21 धावांत 6 विकेटस् अशी जबराट गोेलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा डाव अवघ्या 15.2 षटकांत 50 धावांत उखडून टाकला.

जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. पहिले षटक निर्धाव टाकल्यानंतर सिराजने आपल्या दुसर्‍या षटकात पथूम निसंका, सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डी सिल्व्हा या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना एकाच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर त्याने कर्णधार दासून शनाकाचा त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था 6 बाद 12 धावा, अशी केविलवाणी केली. सिराजने 12 व्या षटकात कुसल मेंडिसचा (17) त्रिफळा उडवला. हार्दिक पंड्याने अप्रतीम बाऊन्सरवर दुनिथ वेल्लालागेला (8) माघारी पाठवले. सिराजला विश्रांती देऊन भारताने हार्दिकला षटक दिले अन् त्याने प्रमोद मदुशानला (1) विराटकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मथिशा पथिराणाला बाद करून श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांवर माघारी पाठवला. हार्दिकने 3 व जसप्रीतने 1 विकेट घेतली.

भारताने श्रीलंकेने ठेवलेले 51 धावांचे माफक आव्हान 6.1 षटकांत एकही फलंदाज न गमावता पार केले. कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिल आणि इशान किशनला फलंदाजीला पाठवले. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 6.1 षटकांतच 51 धावांचे आव्हान पार केले. गिलने नाबाद 27, तर किशनने 22 धावा केल्या.

129 चेंडूंत सामना खल्लास (Asia Cup 2023 Final)

वन-डे क्रिकेट इतिहासातील हा तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात कमी काळ (चेंडूंच्या बाबतीत) चाललेला सामना ठरला. यापूर्वी 2020 मध्ये नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील वन-डे सामना 104 चेंडूंत संपला होता. तर 2001 मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना 120 चेंडूंत संपला. रविवारचा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना 129 चेंडूंत संपला.

सिराजने मने जिंकली, पुरस्काराची रक्कम ग्राऊंडस्मन्सना (Asia Cup 2023 Final)

मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने त्याच्या बक्षिसाची रक्कमदेखील मैदानावरील ग्राऊंडस्मन्सना त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून दिली. त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली. त्याला बक्षीस म्हणून 5,000 डॉलर (सुमारे 4.15 लाख रुपये) मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानातील ग्राऊंडस्मन्सना सुपूर्द केली. तो म्हणाला, हा रोख पुरस्कार मी ग्राऊंडस्मन्सना देतो, ज्यांच्यामुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.

भारताचा 'अष्ट'विजय

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाने आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले.
यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते.
भारताने ही स्पर्धा वन-डेमध्ये सात वेळा आणि टी-20 मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
श्रीलंकेने वन-डेमध्ये पाच वेळा आणि टी-20 मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.

* वन-डे क्रिकेटमध्ये एकाच षटकात 4 विकेटस् घेणारा मोहम्मद सिराज हा पहिलाच भारतीय ठरला.
* 2002 नंतर वन-डे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक विकेटस्चा विक्रम सिराजने नावावर केला.
* 2003 मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 विकेटस् घेतल्या होत्या.
* आशिया चषक (वन-डे) स्पर्धेत 6 विकेटस् घेणारा मोहम्मद सिराज पहिला भारतीय अन् एकंदर दुसरा गोलंदाज ठरला.
* श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध 2008 मध्ये कराची येथे 13 धावांत 6 विकेटस् घेतल्या होत्या. रविवारी सिराजने 6 विकेटस् घेण्याचा पराक्रम केला.
* श्रीलंकेविरुद्ध ही वन-डे क्रिकेटमधील कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. सिराजने पाकिस्तानच्या वकार युनिसचा 1990 मध्ये शारजाह येथे नोंदवलेला (6-26) विक्रम मोडला.
* मोहम्मद सिराजची (6/21) गोलंदाजी ही भारताकडून चौथी सर्वोत्तम कामगिरी ठरली. स्टुअर्ट बिन्नीने 2014 मध्ये बांगला देशविरुद्ध 4 धावांत 6 विकेटस् घेतल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी (1993 साली) वेस्ट इंडिज विरुद्ध 12 धावांत 6 विकेटस् घेतल्या होत्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध 19 धावांत 6 विकेटस् घेतल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news