ashutosh patki
ashutosh patki

घरोघरी मातीच्या चुली : आशुतोष पत्की झळकणार सौमित्र रणदिवेच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली १८ मार्चपासून स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. मालिकेच्या प्रोमोना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून या मालिकेतल्या आणखी एका सदस्याची ओळख नव्या प्रोमोतून होणार आहे. हा नवा सदस्य म्हणजे सौमित्र रणदिवे.

सौमित्र ही भूमिका साकारण्यासाठी आशुतोष फारच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, 'स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेत मी एक छोटी भूमिका साकारली होती. ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. सौमित्र रणदिवे हा वकील आहे. अतिशय हुशार, महत्वाकांक्षी आणि व्यावहारिक. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला आणि नात्यांचं महत्त्व जाणणारा. मी याआधी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळं असं हे पात्र आहे. मालिकेची टीम उत्तम आहे त्यामुळे काम करताना धमाल येतेय अशी भावना आशुतोषने व्यक्त केली.'

घरोघरी मातीच्या चुली या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news