मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळ्याने अद्याप पिच्छा सोडलाच नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. या घोटाळ्यामुळेच प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याची संधी असतानाही त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आणि आज त्यांनी काँग्रेसच्या दिलेल्या राजीनाम्याचा संबंध पुन्हा याच घोटाळ्याशी जोडला जाऊ लागला आहे. ( Ashok Chavan )
संबंधित बातम्या
विशेष म्हणजे ज्या भाजपने त्यांच्यावर या घोटाळ्याबद्दल गंभीर आरोप केले तीच भाजप आता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना सोबत घ्यायला आतुर झाली आहे.केंद्र सरकारने2004 ते 2014 या काळातील युपीए सरकारच्या गैरव्यवहारांबाबत श्वेत पत्रिका प्रसिध्द केली आहे. त्यात आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचा उल्लेख आहे. पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर काहीच दिवसात अजित पवार भाजप-शिवसेनेच्या वळचणीला गेले. श्वेतपत्रिकेनंतर चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने या घोटाळ्याने पुन्हा एकदा त्यांचा बळी घेतला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 5 डिसेंबर 2008 ला राजीनामा द्यावा लागला आणि अशोक चव्हाण यांच्या गळ्यात तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ पडली. पक्ष श्रेष्ठींची निवड सार्थ ठरवित चव्हाणांच्या नेतृत्वात 2009 साली विधानसभा निवडणुका लढण्यात आल्या. त्यांच्यामुळे तिसर्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे चव्हाण आपली 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करतील अशी अपेक्षा असताना 2010 मध्ये आदर्श घोटाळा उघडकीस आला.
कारगिल युद्धातील शहिदांच्या विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत आपल्या नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले. यामुळे अखेर काँग्रेसला नोव्हेंबर 2010 मध्ये त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. आता चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपवासी होऊन त्यांना केंद्रात मोठे मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा रंगली आहे.
आदर्श घोटाळा हे आजवरचा सर्वाधिक अनैतिक, क्रूर व निर्लज्ज असा घोटाळा आहे. कारगीलमध्ये शहिद झालेल्या जवानांच्या विधवांना आदर्श गृहनिर्माण सोसायटीत जी घरे मिळायला हवी होती. ती चव्हाणांनी बळकावली, असा आरोप भाजपच्या तत्कालिन राष्ट्रीय प्रवक्त्या व विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी केला होता. आदर्श प्रकल्प जेव्हा आकाराला येत होता तेव्हा महसूल मंत्री म्हणून चव्हाण हे या गृहनिर्माण समितीच्या पदाधिका-यांच्या संपर्कात होते.
या प्रल्पाच्या संंबधित कागदपत्रांवर त्यांनी महसूल मंत्री या नात्याने स्वाक्ष-या केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री या नात्याने मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून त्यांनी या प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली, असा आरोप सीतारामन व नंतर भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी सातत्याने केला होता. चव्हाणांचा राजीनामा मागत रस्त्यावर उतरून भाजपने आंदोलनही केले होते.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 9 एप्रिल 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या अनुषंगाने ट्विट करत जोरदार टीका केली होती. अशोक चव्हाण सारख्या घर चोरणार्यांना आपण चौकीदार करणार का? अशी विचारणा त्यांनी सार्वजनिकरित्या केली होती. आता हे ट्विट आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ( Ashok Chavan )