मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजपसोबतच्या युतीमुळे मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. आता महाविकास आघाडीत निवडणूक लढविणार्या उद्धव ठाकरेंनी 18 खासदार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान भाजपने दिले आहे.
भाजप देशात 45 जागा तरी जिंकेल का, या उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर भाजपकडून आशिष शेलार यांनी प्रतिआव्हान दिले. भाजपने देशात 45 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही राजकारण सोडाल, हा मर्दाचा शब्द द्या. तुम्ही राज्यात 18 हून अधिक जागा जिंकल्यास मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हान शेलार यांनी दिले.
राज्यात आघाडी 48 जागा जिंकेल तर भाजप देशात 45 जागा तरी जिंकेल का, या उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा आमदार शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हे विधान रेकॉर्ड करून ठेवा. उद्धव ठाकरे, तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचे नेतृत्व करीत असाल तर तुम्हाला माझे जाहीर आव्हान आहे. भाजपने देशात 45 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल, असा मर्दांचा शब्द द्या. महाराष्ट्रात तुम्ही आमच्यामुळे गेल्यावेळी 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळी तुम्ही महाआघाडी म्हणून जर 18 च्या वर गेलात तर मी राजकारण सोडेन, हे माझे खुले आव्हान आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्रात घरात आलेल्या सुनेला मुलगी मानले जाते. तिच्या रूपाने लक्ष्मी घरात आली हा आदर केला जातो. मुलीएवढेच प्रेम तिच्यावर केले जाते. आपल्या वक्तव्याने शरद पवार यांनी तमाम मराठी आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणार्या समस्त मतदारांची मने दुखावली आहेत, असे शेलार म्हणाले.