अॅडलेड; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस (Ashes 2021) मालिकेच्या दुस-या कसोटी सामन्याला अॅडलेड येथे सुरुवात झाली आहे. हा सामना डे-नाईट खेळवला जात असून आज (दि. १६) सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. गुलाबी चेंडूच्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २ बाद २२१ धावा केल्या आहेत. मार्नस लॅबुशेन ९५ आणि स्टीव्ह स्मिथ १८ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधार आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो योग्य ठरला नाही. सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिस वैयक्तिक ३ धावांवर स्टुअर्ड ब्रॉडचा बळी ठरला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांनी शानदार फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी प्रतिक्षा करण्यास भाग पाडले. दोघांनी उत्कृष्ट शतकी भागीदारी केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा शतकाच्या जवळ आला पण दुर्दैवाने त्याला यावेळीही शतक पूर्ण करता आले नाही. अवघ्या ५ धावांची वॉर्नरचे शतक हुकले. बेन स्टोक्सने वैयक्तिक ९५ धावांवर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतवले. (Ashes 2021)
त्यानंतर मैदानात उतरलेल्या स्टीव्ह स्मिथने संथ सुरुवात केली आणि दिवसाच्या अखेरपर्यंत तो क्रीजवर राहिला. दुसरीकडे, मार्नस लॅबुशेननेही संयमी फलंदाजी प्रदर्शन केले. लाबुशेन-स्मिथ जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची नाबाद भागीदारी केली. लॅबुशेनही शतक पूर्ण करण्याची घाई केलेली नाही. तो ९५ आणि स्मिथ वैयक्तिक १८ धावांवर नाबाद आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ८९ षटकांत २ बाद २२१ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडने १-१ बळी घेतला. (Ashes 2021)