पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रोडक्टसचा जगभरात बोलबाला असलेली कंपनी म्हणजे ॲपल. स्टेटस सिम्बल म्हणून हे प्रोडक्टस वापरण्याकडे अनेकांचा कल असतो. ॲपलच्या लोकप्रिय प्रोडक्टसपैकी एक म्हणजे वॉच. पण अलीकडेच या वॉच संदर्भात समोर आलेल्या घटनेमुळे युजर्समध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. ॲपल वॉच सिरिज 7 वापरत असलेल्या एका व्यक्तीने एक व्हीडियो शेयर केला आहे. यात त्याने हे वॉच मनगटावर बांधताच ते ओव्हरहीट होऊन त्यातून धूर निघू लागला.
घाबरलेल्या या व्यक्तीने हातातील घडयाळ काढून सोफ्यावर ठेवलं. यावेळी वॉचओएसचा ओव्हरहीटचा अलार्मही वाजू लागला. धूर निघताच वॉचचा डिस्प्लेही तडकला आणि छोट्या स्फोटासारखा आवाज आल्याचं या युजरने सांगितलं आहे. या प्रकरणात त्या व्यक्तीचा सोफाही जळला. या व्यक्तीने ॲपल कंपनीत याबाबत कळवलं असता कंपनीने कर्मचारी या व्यक्तीच्या घरी पोहोचेपर्यंत घड्याळाला हातही न लावण्याची सूचना केली. पण दुर्दैवाने दुसरा दिवस उजाडला तरी कंपनीची कोणतीही व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहचू शकली नव्हती. या प्रकरणानंतर हे वॉच नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न वापर करणाऱ्यांकडून विचारला जातो आहे.