पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल 2022 हे एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. असे असूनही माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संपूर्ण स्पर्धेत संधी मिळाली नाही. आता खुद्द मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकानेच याबाबत खुलासा केला आहे.
मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड म्हणाले की, अर्जुनला अजून बरेच कष्ट घ्यावे लागतील. मुंबई इंडियन्सच्या संघात निवड होणे ही वेगळी गोष्ट आहे, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे तसे खूप अवघड आहे. त्यासाठी त्याला आणखी मेहनत करावी लागणार आहे. अर्जुनला (Arjun Tendulkar) आपली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल.'
अर्जुनला (Arjun Tendulkar) अजून मेहनत करावी लागणार असल्याची कबुली यापूर्वीच त्याचे वडील आणि भारताचे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. मुंबईने 24 मधील 21 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. मात्र, अर्जुन तेंडुलकरला सातत्याने बेंचवरच बसवण्यात आले.
आयपीएल मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले. 22 वर्षीय हा युवा गोलंदाज यंदाच्या हंगामात मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक होता. त्याचबरोबर चाहत्यांनाही अर्जुन कधी एकदा आयपीएलमध्ये पहिला चेंडू टाकतो असे झाले होते. पण आता त्यांना पुढील आयपीएल हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळाले असून तो मुंबईकडून टी-20 क्रिकेट खेळला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, पण आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने अत्यंत खराब कामगिरी केली. संघाची आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच शेवटच्या स्थानावर घसरण झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणा-या मुंबईने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले. त्यामुळे हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईसाठी कोणताही गोलंदाज किंवा फलंदाज अप्रतिम खेळ दाखवू शकला नाही. संघाला सुरुवातीच्या सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.