Argentina V/s France : जगज्जेता कोण?

Argentina V/s France : जगज्जेता कोण?

दोहा, वृत्तसंस्था : गेले महिनाभर 32 देशांमध्ये रंगलेल्या फुटबॉल विश्वयुद्धाचा (Argentina V/s France) आज शेवट होणार आहे. गतविजेता फ्रान्स आणि मेस्सीचा अर्जेंटिना या दोन दिग्गज संघांमध्ये आज लुसैल स्टेडियमवर फिफा वर्ल्डकप 2022 ची ड्रीम फायनल रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे तिसर्‍यांदा विश्वविजेता कोण होणार आणि 165 कोटी रुपयांचा झळाळता चषक कोण उंचावणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी बघता फ्रान्स वरचढ असल्याचे दिसून येते. फ्रान्स आणि अर्जेंटिना आतापर्यंत 12 वेळा फुटबॉलच्या मैदानावर आमने-सामने आले आहेत. यामध्ये 6 वेळा अर्जेंटिना जिंकला आहे तर फ्रान्सला फक्त 3 विजय मिळाले आहेत. 3 सामने बरोबरीत राहिले आहेत. 1930 साली झालेल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तेव्हा अर्जेंटिनाने 1-0 ने विजय मिळवला होता. फ्रान्सला अर्जेंटिनावर विजय मिळवण्यासाठी 1971 चे साल उजाडावे लागले. दोन्ही देशांदरम्यान झालेला मैत्रीपूर्ण सामना फ्रान्सने 4-3 ने आपल्या नावावर केला होता.

फ्रान्सने जिंकला होता शेवटचा सामना 

गेल्या विश्वचषकात म्हणजे 2018 साली दोन्ही संघ शेवटचे समोरासमोर आले होते. हा सामना 4-3 ने विजय मिळवला होता. हा स्पर्धेचा उपांत्यपूर्व स्पर्धेचा सामना होता. किलिएन एम्बाप्पेने दोन गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. यावेळीही तो संघांचा मुख्य खेळाडू आहे. मेस्सी त्या सामन्यात गोल करू शकला नाही, परंतु तो यंदा चांगल्या लयीत आहे. दोघांच्या नावावर 5 गोल आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

'गोल्डन बूट'ची शर्यत कोण जिंकणार (Argentina V/s France)

लियोनल मेस्सी आणि कायलियन एम्बाप्पे यांनी चालू फिफा विश्वचषकात समान 5-5 गोल केले आहेत. सध्या दोघेही गोल्डन बूटसाठी प्रबळ दावेदार आहेत, पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, अंतिम फेरीनंतरही मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्या गोलची बरोबरी झाली तर काय होईल? फिफा विश्वचषकातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक 'गोल्डन बूट' कुणाला दिला जाणार? यावर फिफाने सोप्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. तांत्रिक समिती यावर निर्णय देते आणि विजेत्याची निवड करते.

अर्जेंटिनाच्या मेस्सीची ही पाचवी तर फ्रान्सच्या एम्बाप्पेची दुसरी विश्वचषक स्पर्धा आहे, पण आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू विश्वचषकातील 'गोल्डन बूट' मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत.

मेस्सी, एम्बाप्पेचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दोघांना अजून एक सामना खेळण्याची संधी आहे. अशातच 'गोल्डन बूट' मिळवायचा असेल तर मेस्सी-एम्बाप्पे यांना गोल करून परस्परांपुढे जावेच लागेल. मात्र, अंतिम सामन्यात दोघांना गोल करता आला नाही आणि त्यांच्या पाटीवर गोलसंख्या समान राहिली तर काय होईल? असा प्रश्न पडतो. मात्र, फिफाच्या नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंचे समान गोल झाले, तर कोणत्या खेळाडूने सर्वात कमी पेनल्टी मारल्या आहेत हे पाहिले जाईल. म्हणजे सर्वात जास्त मैदानी गोल करणार्‍या खेळाडूला प्राधान्य दिले जाईल.

मेस्सीने या विश्वचषकात 3 वेळा पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आहे. त्याने नेदरलँड, क्रोएशिया आणि सौदी अरेबियाविरुद्ध पेनल्टीवर गोलजाळे भेदले आहे. तर एम्बाप्पेच्या नावावर असलेले पाचही गोल मैदानी आहेत. त्यामुळे 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत फ्रेंच खेळाडूचे पारडे जड आहे.

आता जर मेस्सीने फायनलमध्ये गोल केला आणि एम्बाप्पे फायनलमध्ये एकही गोल करू शकला नाही, तर मेस्सी आपोआप 'गोल्डन बूट'चा जिंकेल. पण जर पेनल्टी आणि मैदानी गोल दोन्ही बरोबरीत असतील, तर 'गोल्डन बूट' कुणाच्या पदरात पडणार? हाही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघासाठी गोल करण्यात सर्वाधिक असिस्ट कोणत्या खेळाडूने केले त्याला अव्वल क्रमांक दिला जाईल. अंतिम सामना होईपर्यंत या प्रकारात मेस्सी सरस ठरला आहे. आतापर्यंत त्याने तीन तर एम्बाप्पेने दोन गोलमध्ये असिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान, गोलसंख्या (मैदानी+पेनल्टी), असिस्टची भूमिका यातही समानता राहिली तर सरतेशेवटी कोणता खेळाडू कमी वेळ मैदानावर खेळला यावर निर्णय दिला जाईल.

विजेत्याला मिळणार 350 कोटी…

कतार या आखाती देशात 20 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेला फिफा विश्वचषक 2022 आता अंतिम टप्प्यात आला आहे. मोरोक्कोवर 2-0 ने मात करत गतविजेत्या फ्रान्सने सलग दुसर्‍यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर मेसीच्या अर्जेंटिनाचे आव्हान असणार आहे. आज हा सामना खेळवण्यात येईल. फिफा या स्पर्धेसाठी 3.5 हजार कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करणार आहे. त्यामुळे कोण होणार 350 कोटींचा मालक? अर्जेंटिना की फ्रान्स याची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

बत्तीसही संघ होणार मालामाल (Argentina V/s France)

फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकणार्‍या संघाला सुमारे 350 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल.
अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला सुमारे 250 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.
तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या संघाला सुमारे 220 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 204 कोटी रुपये मिळणार आहेत.
फुटबॉल विश्वचषक 2022 मध्ये 5 व्या ते 8 व्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे 138 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल.
9 व्या ते 16 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना सुमारे 106 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.
17 व्या ते 32 व्या क्रमांकावर राहणार्‍या संघांना सुमारे 74 कोटी रुपये मिळतील.

विश्वचषकात खेळणार्‍या खेळाडूंचे मानधन (Argentina V/s France)

ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना फी दिली जाते, त्याचप्रमाणे फुटबॉलचे सामने खेळणार्‍या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी फी दिली जाते. येथे हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे की संघातील खेळाडूंना वेगवेगळी मॅच फी मिळते. सध्या खेळाडूंना सर्वाधिक फी देणारा संघ ब्राझील आहे. ब्राझील आपल्या खेळाडूंना एका सामन्यासाठी सुमारे 4.85 लाख रुपये फी देते. फ्रान्स आपल्या खेळाडूंना 3.31 लाख रुपये देते. स्पेन आपल्या खेळाडूंना एका सामन्यासाठी सुमारे 2.90 लाख रुपये फी देते. त्याचप्रमाणे जर्मनी आपल्या खेळाडूंना सुमारे 2.65 लाख रुपये आणि इंग्लंड सुमारे 2.48 लाख रुपये सामन्याचे मानधन देते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news