Sweating : तुम्‍हाला अचानक घाम येतोय? जाणन घ्‍या काय आहे वैद्यकीय कारण

Sweating : तुम्‍हाला अचानक घाम येतोय? जाणन घ्‍या काय आहे वैद्यकीय कारण

बऱ्याच व्यक्तींना रात्री झोपल्यानंतर अतिशय घाम येतो. ही समस्या सर्वसामान्यपणे अनेक व्यक्तींमध्ये दिसून येते. याबाबत कारणे शोधताना तज्ज्ञ सर्वप्रथम झोपण्याची जागा कशी आहे याबाबत चौकशी करतात. झोपण्याची खोली अधिक गरम असेल, अंगावर जास्त पांघरुणे घेतली जात असतील तर घाम येणे ही सामान्य गोष्ट आहे, पण असे नसूनही शरीरावर अतिरिक्त घाम (Suddenly Sweating) येत असेल तर त्यामागे नक्कीच काही तरी वैद्यकीय कारण आहे हे लक्षात घ्यावे. खूप जास्त घाम येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जाणून घेवूया या वैद्यकीय कारणांबाबत..

अचानक घाम येण्‍यामागील एक कारण म्हणजे इंडोपॅथिक हायपर हायड्रोसिस. या स्थितीमध्ये शरीर बराच काळ खूप जास्त घाम तयार करते. यामागे कुठलेही एखादे विशिष्ट वैद्यकीय कारण नसते; पण घाम मात्र जास्त येत असतो.

दुसरे कारण म्हणजे मेनोपॉझ. बर्‍याचदा महिलांना या कालावधीमध्ये अचानक गरम वाटू लागते आणि त्यामुळे खूप जास्त घाम येऊ लागतो.

खूप जास्त घाम येण्याचे आणखी एक कारण म्हणजे संसर्ग होय. खासकरून ट्युबर क्युलॉसिस अर्थात टीबीच्या आजारामध्ये घाम येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे इतर जीवाणूसंसर्गाच्या आजारामध्येही घाम येण्याचे लक्षण दिसून येते.

ठराविक प्रकारची औषधे घेतल्यामुळेसुद्धा रात्रीच्या वेळी घाम येतो. कुठल्याही प्रकारची शारीरिक लक्षणे, संसर्ग किंवा इतर काही त्रास दिसत नसला तरी विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे रात्रीच्या वेळी घाम येतो. तसेच हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यासदेखील असा त्रास होतो.

हायपरथायरोडिजम आणि फिओक्रोमोसायटोमा यासारख्या आजारांमध्ये शरीर अचानक गरम वाटू लागणे, खूप घाम येणे अशी लक्षणे दिसतात. याखेरीज उच्च रक्तदाबाची समस्या असणार्‍यांना रक्तदाब वाढल्यामुळे अचानक घाम येण्याची समस्या भेडसावते. अशा रुग्णांना घाम येण्याबरोबरच अस्वस्थपणाही जाणवतो.

एकंदरीत, रात्रीच्या वेळी घाम येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. यापैकी कुठले कारण त्यामागे आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी डॉक्टरना सर्व माहिती तपशिलाने सांगणे आणि त्यांच्या सूचनांनुसार तपासण्या करून उपचार घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news