व्यक्‍तिचित्र : भारतीय रेल्वेचा नवा चेहरा

व्यक्‍तिचित्र : भारतीय रेल्वेचा नवा चेहरा
Published on
Updated on

जगात चौथ्या क्रमांकावर असणार्‍या 'भारतीय रेल्वे'च्या 186 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 'रेल्वे मंडळा'च्या अध्यक्षपदी एका कर्तबगार महिला अधिकार्‍याची नियुक्ती झाली आहे. जया वर्मा सिन्हा त्यांचे नाव. आता त्या रेल्वे मंडळाच्या चेअरमन आणि सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत. वास्तविक महिनाभरातच त्या या पदावरून निवृत्त होणार होत्या. मात्र, मोदी सरकारने त्यांना आणखी वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. एक वर्ष हा फार मोठा काळ नसला तरी या कालावधीत त्यांना आपले प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्याचा फायदा देशाला मिळवून देण्याची संधी लाभली आहे.

देशात 1837 मध्ये पहिली रेल्वे धावली. त्यानंतर 1905 साली रेल्वे मंडळाची विधिवत स्थापना झाली. रेल्वेच्या 18 विभागांचे महाव्यवस्थापक या मंडळाच्या मार्गदर्शनात काम करतात. आता या सर्वांना जया वर्मा सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय रेल्वेला मिळेल, यात संदेह नाही.

जया या मूळच्या उत्तर प्रदेशातील. 18 सप्टेंबर 1963 रोजी त्यांचा जन्म प्रयागराज येथे झाला. त्यांचे वडील महालेखा नियंत्रक विभागात अधिकारी होते. त्यांनी तत्कालीन अलाहाबाद विद्यापीठाच्या बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. 1988 साली त्या रेल्वे सेवेत आल्या. 1986 साली त्यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यावेळी गुणवत्ता यादी म्हणजेच मेरीट लिस्टमध्ये त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर होते. ठरवले असते तर त्यांना तेव्हा भारतीय पोलिस सेवेत सहज भरती होता आले असते. महसूल खात्याचा पर्यायही त्यांच्यापुढे हात जोडून उभा होता.

त्यांच्यासोबत ज्या अन्य महिला उमेदवारांची निवड झाली होती, त्यांनी भारतीय पोलिस सेवा किंवा महसूल सेवेला प्राधान्य दिले होते. याचे दुसरे कारण म्हणजे या दोन्ही सेवांत कार्यालयात बसून काम करावे लागते. फारशी धावपळ करावी लागत नाही. रेल्वे ट्रॅफिक विभागातील परिस्थिती नेमकी याच्या उलट. तेथे पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे काम करावे लागते. मुख्य म्हणजे रेल्वे ट्रॅफिक विभागातील बड्या अधिकार्‍यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होेतो. कारण त्यांना अनेक विभागांशी समन्वय साधायचा असतो. शिवाय सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यासाठी छोट्या इंजिनमधून अनेक लोहमार्गांवर भटकंती करावी लागते. हे सगळे काम जोखमीचे आणि अत्यंत आव्हानात्मक असते. म्हणूनच जया यांना रेल्वे खात्यात काम करायचे होते. कारण त्यांना सुरुवातीपासून रेल्वेबद्दल वेगळेच आकर्षण होते.

आपले सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जया यांची पहिली नियुक्ती सहआयुक्त म्हणून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाली. त्यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक असे पद नव्हते. या पदाला विभागीय अधीक्षक असे संबोधले जात असे. नंतर त्यांना विभागीय व्यवस्थापक (वाणिज्य) म्हणून पदोन्नती मिळाली. रेल्वेच्या संगणकीकरणात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. रेल्वेचे संगणकीकरण करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी जया यांनी याकामी मोठी भूमिका बजावली होती. रेल्वेची 'फ्रेट ऑपरेशन इन्फर्मेशन सिस्टीम' विकसित करण्याच्या प्रकल्पात त्यांचा मोलाचा वाटा होता. रेल्वेतील परिचालन, वाणिज्य, आयटी आणि दक्षता विभागातील कामांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. उत्तर रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वेत त्यांनी विविध पदे भूषविली. प्रधान मुख्य वाहतूक व्यवस्थापकपदही सांभाळणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

अनेक महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर त्यांची नियुक्ती बांगला देशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात करण्यात आली. तिथे त्या चार वर्षे रेल्वे सल्लागार होत्या. याच काळात कोलकाता ते ढाका ही 'मैत्री एक्स्प्रेस' सुरू झाली. हा क्षण त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. याखेरीज अनेक महत्त्वाचे पूल उभारणे आणि अन्य कित्येक प्रकल्पांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

जया यांना आयपीएस होण्याची संधी चालून आली होती. ती त्यांनी स्वीकारली नाही. मात्र, ही कमतरता त्यांनी वेगळ्या पद्धतीने भरून काढली. जेव्हा त्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होत्या, तेव्हा नीरज सिन्हा यांच्याशी त्यांची मैत्री झाली. योगायोगाची गोष्ट म्हणजे नीरज यांची निवडदेखील भारतीय रेल्वे सेवेत झाली होती. मात्र, त्यांना भारतीय पोलिस सेवा खुणावत होती. त्यामुळे त्यांनी नव्याने भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यांचे स्वप्न वास्तवात उतरले.

यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांचे शुभमंगल झाले. आता जया वर्मा यांचे नामकरण जया वर्मा सिन्हा असे झाले. आयपीएस झाल्यानंतर नीरज यांना बिहार कॅडर मिळाले. त्यावेळी बिहारचे विभाजन झालेले नव्हते. म्हणजेच झारखंड हे राज्य बिहारचाच एक भाग होते. बिहारची उन्हाळ्यातील राजधानी रांची येथे नीरज यांना सर्वात पहिली पोस्टिंग मिळाली. तेथे ते पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले. पाठोपाठ जया यांनीही आपली बदली रांचीला करून घेतली. त्यावेळी रांचीत रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. याच प्रकल्पावर जया यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून हे जोडपे विविध ठिकाणी एकत्र कार्यरत आहे. सध्या नीरज हे बिहारच्या नागरी पोलिस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

जया वर्मा सिन्हा शालेय वयातच एक हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. जया अव्वल दर्जाच्या छायाचित्रकार आहेत. त्यांना प्रामुख्याने पक्ष्यांचे मूड आपल्या कॅमेर्‍यांत टिपायला आवडते. त्यांच्याकडे स्वतः टिपलेल्या पशुपक्ष्यांच्या छायाचित्रांचे अनेक अल्बम्स आहेत. याखेरीज त्यांना संगीताची केवळ आवडच नव्हे तर उत्तम जाणही आहे. किशोर कुमार हे त्यांचे आवडते गायक आहेत. फावल्या वेळात त्या किशोरदांची गाणी ऐकतात. जया आणि नीरज या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव अवनिका आहे. सध्या दिल्लीत तिचे शिक्षण सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news