आदमापूरच्या बाळूमामा देवालय समितीवर प्रशासकाची नियुक्ती; नाईकवाडे यांच्याकडे कार्यभार

आदमापूरच्या बाळूमामा देवालय समितीवर प्रशासकाची नियुक्ती; नाईकवाडे यांच्याकडे कार्यभार

मुदाळ तिट्टा : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय समितीवर अखेर सोमवारी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला. सहाय्यक धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी शिवराज नाईकवाडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

बाळूमामा देवालय समितीतील विश्वस्तांमध्ये नियुक्तीवरून बरेच दिवस वाद सुरू आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात काही भक्तांनी समितीचा कारभार व्यवस्थित नसल्याची तक्रार केली होती. त्याची धर्मादाय उपआयुक्त यांच्याकडून चौकशी सुरू होती. दरम्यान, देवस्थानच्या कारभारावर लक्ष राहावे यासाठी निरीक्षक नेमण्यात आले होते व त्यांच्या माध्यमातून सर्व कामकाज हाताळले जात होते. देवालयामध्ये असणार्‍या दानपेट्या या सीसीटीव्हीच्या कक्षेत मोजमाप करून बँकेच्या खात्यामध्ये भरणा केला जात होता. सेवा सुविधा पुरवण्यासाठी महिना 21 लाख रुपये खर्चाची मर्यादाही ठेवण्यात आली होती.

बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदी आपलीच निवड व्हावी अशी समितीमधील अनेक ट्रस्टींची इच्छा होती. पण मगदूम हयात असतानाच कार्याध्यक्षपदाचा कार्यभार विद्यमान अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याकडे देण्यात आला होता. त्यासंदर्भाचे ठराव ट्रस्टीच्या समोर करण्यात आले होते. पण याला विरोध करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी मासिक बैठकीत गावातील पाच जणांची समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, गावातील सदस्याऐवजी मृत सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी ट्रस्टीवर निवड करावी, अशी मागणी काही मंडळींनी पुढे केली. त्यातूनच पुढे दोन गटांत संघर्ष सुरू झाला. काही बाहेरगावच्या ट्रस्टींमधून पुंडलिक होसमणी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यातून दोन गटांत हाणामारीही झाली होती.

गेले अनेक दिवस धर्मादाय उपायुक्त कार्यालय यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या वादाची अखेर आज प्रशासक नियुक्तीत झाली. सोमवारी रात्री उशिरा प्रशासक शिवराज नाईकवाडेे, निरीक्षक एम. के. नाईक व सत्यनारायण शेनाय यांनी मंदिरात येऊन कार्यभार स्वीकारला. काही कागदपत्रे व कपाटे सील केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news