मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंडलिक, माने यांचे अर्ज

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंडलिक, माने यांचे अर्ज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत भरण्यात येणार आहे. गांधी मैदान, महाद्वार रोड, शिवाजी चौक, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप अशी महायुतीची रॅली निघणार आहे.

अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी नऊ वाजता गांधी मैदान येथे जमणार आहेत. तेथून शक्तिप्रदर्शन करत सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. या मार्गात छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पेट्रोल पंप चौक येथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.

सर्व कार्यकर्ते खानविलकर पंप चौक येथेच थांबणार आहेत. मोजक्या नेत्यांसह उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन अर्ज दाखल करणार आहेत. 'अब की बार चारसो पार'चा नारा देत नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना पाठबळ देऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित राहतील. त्यांच्यासमवेत माजी मंत्री विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजप नेते समरजित घाटगे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, के. पी. पाटील, भाजप नेते शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अशोक चराटी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भैया माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राजेखान जमादार व रवींद्र माने, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, नाथाजी पाटील, आदिल फरास, रणजित जाधव, शहर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तम कांबळे, सिद्धार्थ घोडेराव आदींसह माजी नगरसेवक, जि.प., पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित राहणार आहेत.

'हातकणंगले'साठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावली आहे. याकरिता त्यांनी शनिवारी (दि. 13) संपूर्ण रात्रभर बैठका घेतल्या. रात्री साडेदहा वाजता सुरू झालेल्या हा त्यांचा बैठकांसाठीचा दौरा रविवारी पहाटेपर्यंत सुरू होता. शनिवारी दुपारी कोल्हापूर दौर्‍यावर आलेले शिंदे रात्री झोपलेच नाहीत. रविवारी सकाळी ते मुंबईला रवाना झाले. सोमवारी पुन्हा ते कोल्हापूर दौर्‍यावर येत असून ते संबंधितांशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे.
हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार माने यांच्या उमेदवारीला प्रारंभीपासून भाजपसह महायुतीच्या काही घटक पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला होता. ही जागा भाजपने लढवावी अशी मागणीही होती. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला. या मतदारसंघातून माने यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीचा घटक असलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडाचे निशाण फडकवले. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याही सावध भूमिकेमुळे हातकणंगले मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली.
या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी दुपारी कोल्हापुरात आमदार डॉ. विनय कोरे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आ. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतरही आवाडे यांनी आपली भूमिका कायम ठेवली. आवाडे यांच्या बंडाचा दबाब मुख्यमंत्र्यांनी झुगारत याबाबत फडणवीस निर्णय घेतील, असे स्पष्टही केले. मात्र, आवाडे यांची भूमिका कायम राहिली तर महायुतीला अडचण होऊ शकते. यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी हातकणंगले मतदारसंघासाठी आ. कोरे आणि आ. यड्रावकर यांची भेट घेतली.
आ. कोरे यांना भेटण्यासाठी रात्री साडेदहा वाजता शिंदे यांनी कोल्हापूर सोडले. रात्री साडेबारापर्यंत ते वारणानगर येथे होते. त्यानंतर अडीचपर्यंत कणेरी मठावर होते. यानंतर ते पहाटे तीन वाजता जयसिंगपूरला गेले, पहाटे यड्रावकर यांची भेट घेऊन सुमारे दीड तास त्यांच्याशी चर्चा केली. आ. कोरे आणि आ. यड्रावकर यांच्या बैठका घेऊन शिंदे रविवारी पहाटे पाच वाजून 50 मिनिटांनी मुंबईला विमानतळावरून रवाना झाले. शनिवारी रात्री न झोपता संपूर्ण रात्र शिंदे यांनी या मतदारसंघासाठी जागून काढली.

दरम्यान, शिंदे सोमवारी (दि. 15) महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. ते दुपारी 12 वाजता कोल्हापुरात येतील. यानंतर दुपारी अडीच ते चार या वेळेत पुन्हा चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याकरीता संबधितांना या वेळेत भेटण्याचे निरोपही गेले आहेत. यामुळे शिंदे यांच्या सोमवारच्या दौर्‍याकडेही लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news