संरक्षण : संरक्षणाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

संरक्षण : संरक्षणाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

मानवी इतिहासात अणुस्फोटाइतकी किंबहुना त्याहून अधिक विध्वंसाची क्षमता असणारे तंत्रज्ञान केवळ आणि केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे. कदाचित ते कल्पनेपेक्षा अधिक विध्वंसक राहू शकते. सामर्थ्यवान कृत्रिम बुद्धिमत्तेचा उद्देश मानवतेपासून दूर जाणारा असेल तर भविष्यात त्याचे परिणाम कल्पनातीत भयावह असू शकतात. सर्वात धोकादायक अणि भीतीदायक बाब म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वयंचलित शस्त्रांशी जोडणे. हे विनाशाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकणे होय.

सध्या जगातील सर्वच शक्तिशाली सैन्य दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा समावेश करण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. मात्र अतिरेकी प्रमाणात होणारा हा वापर आणि त्याचे दुष्परिणाम पाहता आपल्याला संभाव्य संकटांचा विचार करणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील अण्वस्त्रसज्जता लक्षात घेता जॉर्ज बुश आणि गोर्बाचेव्ह यांच्या नि:शस्त्रीकरण करारापासून प्रेरणा घेत जागतिक करार अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी किती जायचे याचा विचार करणेही गरजेचे आहे.

मानवी इतिहासात अणुस्फोटाइतकी किंबहुना त्याहून अधिक विध्वंसाची क्षमता असणारे तंत्रज्ञान केवळ आणि केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे. कदाचित ते कल्पनेपेक्षा अधिक विध्वंसक राहू शकते. अणुबॉम्बच्या शोधामागे सर्वनाशाची कल्पना होती. पण त्यानंतर हळूहळू विकसित होणारे तंत्रज्ञान त्या थराला पोचलेले नव्हते. मात्र चॅट जीपीटीसारख्या तंत्रज्ञानाने अमर्याद शक्यतांचे अद्भुत दर्शन जगाला घडवले तेव्हापासून इंटरनेटचे संपूर्ण जग त्याच्या अचाट क्षमतेने आश्चर्यचकित झाले. संपूर्ण जगाचे आकलन असणार्‍या सक्षम आणि सामर्थ्यवान कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय होत असेल आणि दुर्दैवाने त्याचा उद्देश मानवतेपासून दूर जाणारा असेल तर भविष्यात त्याचे परिणाम कल्पनातीत भयावह असू शकतात. सर्वात धोकादायक अणि भीतीदायक बाब म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वयंचलित शस्त्रांशी जोडणे. हे विनाशाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकणे होय. कारण यात मागे फिरण्याचा मार्गच सापडत नाही.

जगातील सर्व मोठी सैन्य दले एआयचा समावेश करण्याबाबत उत्सुक असून त्यांची चढाओढही सुरू झाली आहे. सध्या त्याचा संबंध शस्त्रे किंवा ड्रोन नियंत्रित करण्यापुरताच आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे एआयसंदर्भात धोरणात्मक निर्णय आणि युद्ध रणनीती आखण्याचे कामही केले जात आहे; पण ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संहारक शस्त्रे तयार केली जात आहेत, ते पाहता एक ना एक दिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मानवी रुपात असणारा दूरदर्शीपणा आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर काम करण्याची क्षमता मागे टाकत पुढे जाईल आणि ते नियंत्रणहीन बनेल याची भीती आहे. स्टॅनफोर्डच्या हुवर इन्स्टिट्यूट येथे वारगेमिंग आणि क्रायसिस सिमुलेशन इनिशिटिव्हचे संचालक जॅकलिन श्नाईडर यांनी 2018 मध्ये तयार केलेल्या एका गेमची माहिती दिली. हे एक अणुसंघर्षाचे मॉडेल आहे आणि यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष, माजी परराष्ट्रमंत्री, नाटोचे वरिष्ठ अधिकारी यांसारख्या लोकांचा खेळात समावेश आहे. अमेरिकेचे शत्रू अणुहल्ला करण्याचे नियोजन आखतात आणि त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आखण्यात येणारी रणनीती हा या खेळाचा गाभा आहे.

अध्यक्ष अणि त्यांचे मंत्रिमंडळ या गंभीर स्थितीचा सामना करण्यासाठी निर्णय घेण्याची तयारी करत आहेत. सैन्यप्रमुखांना चोख प्रत्युत्तर देण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी अमेरिकेचे गुप्तचर हे शत्रूकडे सायबर शस्त्रे असल्याची माहिती देतात तेव्हा अमेरिकी मंत्रिमंडळ द्विधा मन:स्थितीत सापडते. शत्रूची सायबर शस्त्रे अध्यक्षांंना आणि लाँच कमांडसारख्या जबाबदार अधिकार्‍यांना अणुशस्त्रांपर्यंत पोचण्यापासून रोखतात. या भयानक स्थितीत अन्य कोणताही पर्याय सापडत नाही. अशा वेळी काही खेळाडू क्षेपणास्त्र स्थळावर तैनात केलेल्या अधिकार्‍यांना अधिकार प्रदान करतात आणि अणुहल्ला करावा की नाही त्यावर विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार सोपवितात. मात्र आश्चर्यकारकरीत्या बहुतांश खेळाडू अण्वस्त्रे सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित करण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी अणुहल्ला कधी करायचा यासाठी एक सशक्त अल्गोरिदम तयार करण्याची बाजू मांडण्यात येते.

हल्ला करण्याचा निर्णय मानवी मेंदूने घेण्याऐवजी एआयवर सोपविला जातो. शीतयुद्धाच्या काळात हिरोशिमावर बॉम्बवर्षाव करणारे विमान हे अणुहल्ल्यासाठी सर्वात सोयीचे उपकरण होते. या विमानाला सोव्हिएत संघ आणि अमेरिका यादरम्यान उड्डाण करत लक्ष्य गाठण्यासाठी बराच काळ लागायचा आणि संबंधित अध्यक्षाला अणुहल्ल्याचा इशारा हा एक तास अगोदर किंवा त्यापेक्षा अधिक काळ लवकर समजायचा. अशावेळी परस्पर संवाद करून हल्ला थांबविणे किंवा चर्चा फिस्कटल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत हल्ला करण्यासाठी हा पुरेसा वेळ होता. 1958 मध्ये आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल (आयसीबीएम) चा शोध लागला आणि याप्रमाणे हल्ल्याची वेळ आणखी कमी झाली आणि तो तीस मिनिटावरच आला. मात्र जगातील दोन महाशक्तींनी अवकाशात सोडलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून क्षेपणास्त्राची वेळ अचूकरीत्या समजण्यास हातभार लागला. परिणामी हल्ल्याचे लक्ष्य आणि त्याचा मार्ग समजणे सोयीचे झाले.
अण्वस्त्रधारी देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रासह अनेक नवीन क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करत आहेत. त्याचा प्रयोग रशियाने युक्रेनवर केला आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने युक्त असलेले क्षेपणास्त्र आपल्या सुरक्षेसाठी एवढ्या वेगाने लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतात की शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळच मिळत नाही. इतक्या गतीने जाऊनही ते अचूक लक्ष्य गाठते.

आपल्या संरक्षण सिद्धतेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे अण्वस्त्रवाहू व्हावेत असे रशिया आणि चीनला वाटते. हे तंत्रज्ञान पुन्हा एकदा निर्णयाचा कालावधी निम्मा करू शकतात. त्यावर तोडगा एआयमध्येच पाहावयास मिळतो. यानुसार आगाऊ सूचना देणारी प्रणाली सक्रिय होताच विद्युत वेगाने अण्वस्त्रे सोडण्याचा निर्णय अत्यंत कमी वेळेत घेऊन देशाची सुरक्षा निश्चित करणे शक्य आहे. पण याठिकाणी स्वयंचलन हे पुन्हा जोखीम निर्माण करते. 1983 मध्ये सोव्हिएत संघाच्या आगाऊ सूचना देणार्‍या प्रणालीने असाच घोळ केला. मध्य पूर्व देशांवर गरजणारे ढग पाहून या प्रणालीने शत्रूंचे क्षेपणास्त्र असल्याचे सिग्नल दिले. त्यावेळी सोव्हिएत सैन्याचे लेप्टनंट कर्नल स्टेनिस्लाव पॅत्रोव यांनी सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करत ती चुकीची माहिती असल्याचे सांगितले आणि पुढचा अघटित प्रकार टाळला.

आजच्या काळातील संगणकाचे अल्गोरिदम हे अधिक अचूक असले तरी त्याची कार्यशैली ही गूढ रूपातील आहे. एआय मॉडेल हे संंदिग्ध वातावरणातील घटनांचा सामना करत असतील आणि आणि त्यांच्या डेटात याचा समावेश नसेल तर हे तंत्रज्ञान संभ्रमात राहून संभाव्य हल्ल्याची चुकीची माहिती प्रसारित करू शकतात. यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजू शकतो.

कल्पना करा, जेव्हा एआयच्या हातात नियंत्रण असेल तेव्हा दहशतवादी अण्वस्त्र निर्मितीवर खर्च करण्याऐवजी एआयला गोंधळात टाकणारे तंत्रज्ञान यंत्रणा विकसित करतील. यामुळे युरेनियम चोरण्याऐवजी आणि अणुबॉम्ब तयार करणार्‍या माणसाचे अपहरण करण्याऐवजी अशा प्रकारचे तंत्रज्ञान त्यांना लाख पटीने सोयीचे जाईल. भविष्यात एआय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अण्वस्त्रेवाहू क्षेपणास्त्र डागण्यापासून ते लक्ष्यभेद करण्यापर्यंत लागणारा वेळ हा कमी होत जाईल अणि एक वेळ अशी येईल की, उच्च तंत्रज्ञानामुळे आपल्याला त्याचे नियंत्रण एआयच्याच हवाली करावे लागेल. परंतु अशी कृती ही दूरवर असणार्‍या सर्वनाशाला जवळ आणणारी ठरणार आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news