होराभूषण रघुवीर खटावकर
नवीन वर्षाच्या (2024) निमित्ताने 12 राशींचे वार्षिक भविष्य दिले जाणार असून, त्याची सुरुवात आजपासून…
राशीस्वामी मंगळ, अग्नी तत्त्व, चर स्वभाव राशीत अश्विनी, भरणी, कृत्तिका (1 चरण) नक्षत्रे आहेत. बोध चिन्ह-मेंढा, वर्षभर नेपच्यून राशीला 12 वा प्लुटो 10 वा शनि आहे. स्वत:च्या कुंभ राशीत उत्तम फलदायी आहे. आजपर्यंत केलेल्या कामाचे सार्थक होईल. नावलौकिक वाढेल. कायम स्वरूपाची नोकरी मिळेल. धनवृद्धी होईल. मानसन्मान व दर्जा वाढेल.
वृद्ध व्यक्ती आर्थिक अडचणीत येणार नाहीत; पण आरोग्य बिघडू शकेल. कुपथ्य करू नका. मित्रांची संगत सोडू नका. सर्वांनीच या काळात प्रामाणिकपणाने धन जमविले, तरच पुढे येणार्या साडेसातीत तुमचा निभाव लागेल. त्यातून आता तुमच्या राशीच्या 12 व्या स्थानात नेपच्यून पुढे अनेक वर्षे राहणार आहे. गुप्त संकटांना तोंड द्यावे लागेल.
प्लुटोसारखा ग्रह या वर्षी तरी तुमची अधोगती करणार नाही. पण, नंतर मात्र धंदा- व्यवसायात मोठे चढ-उतार होत राहतील. स्वत:कडे सत्ता असेल, तर दुरूपयोग करू नका. नेपच्यून-प्लुटो साडेसातीत 2025 नंतर तुम्हाला त्रासदायक होण्याची शक्यता आहे; पण दोन वर्षे चिंता नाही.
गुरू हर्षल मेपर्यंत तुमच्या राशीत असतील. आकस्मिक घटनातून आपण सावरू शकाल. मेनंतर गुरू व जूननंतर हर्षल धनस्थानी आल्यामुळे गुरूकृपा वाढेल. विवाह नोकरी धंदा यासाठी हे वर्ष उत्तमच राहील. पूर्वार्धात मे पर्यंत गुरू व 12 व्या स्थानातील राहूमुळे परदेशात जाण्याच्या संधी सोडू नका. विवाहेत्सुकांनी या वर्षात सुरुवातीलाच जोडीदाराची पसंती केली, तर हे वर्ष संततीसाठीही चांगले राहील.
गुरूकृपेमुळे विद्यार्थ्यांनी आता मागे वळून पाहू नये. 'तू चाल पुढे' संधी तुमची वाट पाहत राहील. तरीही पूर्वार्धात नातेवाईक, मित्रमंडळींशी लहरीपणाने वागू नये. कर्जफेडीसाठी, प्रॉपर्टीसाठी हे वर्ष उत्तम राहील. इतरांशी तुच्छतेने वागण्याची प्रवृत्ती वाढेल. तिला आवर घाला. घरात मंगल कार्ये होतील, नोकरीत बढती मिळेल.
राशीस्वामी मंगळ सुरुवातीला 5 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत दशमस्थानी राहील. धंद्यात सावधानता बाळगा. एप्रिलपर्यंत प्रॉपर्टीची कामे बरीच मार्गी लागतील. खर्च खूप वाढेल. भावनावेग आवरा. ऑक्टोबरनंतर पाण्यापासून संसर्ग होण्याची शक्यता आहे. पोटदुखीसारखे विकार जाणवतील. फेब्रु-मार्च आणि ऑगस्ट सप्टेंबरमधील शुक्राचे भ्रमण धंदा-व्यवसाय करणार्यांना त्रासदायक जाईल. पण, कामात जोडीदाराची मदत होईल.
मे महिन्यात बुध आपल्या राशीत असताना बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवा; अन्यथा जवळच्या व्यक्ती दुखावल्या जातील. नुकसान होईल.
रविचे मिथुनेतील भ्रमण (जून-जुलै), कन्येतील भ्रमण (सप्टें-ऑक्टो) मकर कुंभेतील वर्षाच्या सुरुवातीचे जानेवारी-फेब्रु-मार्च मधील भ्रमण हमखास यश मिळण्याची ग्वाही देत आहे. या काळात चुकून अडथळे आले, तरी प्रयत्न सोडू नका. तुमच्या राशीतील एप्रिल-मे मधील रविचे भ्रमण गुरू-हर्षल सोबत असल्यामुळे अचानक बढतीच्या, नवीन नोकरीच्या संधी प्रयत्नांनी मिळू शकतील. पण, या काळात प्रकृतीवर फार ताण पडेल, असे काही करू नका. उगाच चिंता करणे सोडून द्या. संततीचे प्रेम लाभेल.
रविचे मीनेतील (मार्च-एप्रिल), कर्केतील (जुलै-ऑगस्ट), वृश्चिकेतील (नोव्हें-डिसें)मधील भ्रमण थोडे कष्ट वाढवणारे, काळजी करायला लावणारे राहील; पण वर्षभर गुरूकृपा राहील.
मे-जून महिने विपरीत घटनेतून लाभ करून देणारे आहेत. सर्वसाधारण नियमाप्रमाणे कार्यसिद्धीस चंद्रबल आवश्यक असते. या वर्षातील आपल्या राशीसाठी चंद्रबल असणार्या तारखा खालीलप्रमाणे राहतील.
जानेवारी 2024 – 2, 15, 18, 20, 23.
फेब्रु – 15, 16, 19, 20, 21, 27, 29.
मार्च – 1, 14, 17, 18, 25,26,27,29
एप्रिल – 14,15,21,22,23,24,25.
मे – 18,19,20,21,22,28.
जून -15, 17,1 8, 19,24,25,26.
जुलै- 12,14,16,22,23,24,25.
ऑगस्ट -10, 11, 12,18,20,20,21,24.
सप्टें- 9, 14, 16,17, 21,22.
ऑक्टोबर-12, 13, 14, 15, 18, 19 20,21.
नोव्हें -8, 9, 10, 11, 14,15.
डिसेंबर – 6, 7, 8,12, 13,16, 17.
थोडक्यात, प्रयत्नवादी व्यक्तींना त्यांच्या जन्मस्थ कुंडलीतील चांगल्या योगाप्रमाणे फळ देणारे असे हे वर्ष आहे.