आंध्र प्रदेशात अटीतटीच्या लढती

आंध्र प्रदेशात अटीतटीच्या लढती

आंध्र प्रदेशात यावेळी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना दुहेरी आव्हानांना सामोरे जायचे आहे. एकीकडे एनडीए आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी. त्यामुळे सर्व 25 मतदार संघांत तिरंगी सामने होणे अटळ आहे. त्यासाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सर्वच मतदार संघांमध्ये चुरस निर्माण झाल्यामुळे दोन ते तीन टक्के मतांचा झोकादेखील प्रमुख पक्षांच्या विजयाची समीकरणे बिघडवू शकतो.

आंध्र प्रदेशात यावेळी कधी नव्हे एवढी चुरस प्रत्येक मतदार संघात दिसून येत आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसपुढे गेल्यावेळची कामगिरी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. त्यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे रेड्डी कुटुंबात फूट पडली आहे. शर्मिला सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असून, यशाचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अर्थात, खरी लढत वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यात आहे. जगनमोहन यांच्या कल्याणकारी योजनांवर लोक खूश असले, तरी त्यांना प्रस्थापितविरोधी कौलाचा सामना करायला लागत आहे. कारण, तेलगू देसमने त्यांच्या विरोधात जनमत एकवटण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. भाजप आणि दक्षिणेकडील सुपरस्टार पवन कल्याण यांचा पक्ष जनसेना हाही नायडू यांच्यासोबत आहे. मच्छलीपट्टणम भागात पवन यांचा मोठा प्रभाव आहे. भाजप आणि तेलगू देसम यांना एकत्र आणण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी त्यांच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 49 टक्के, तर तेलगू देसमला 40 टक्के मते मिळाली होती. जनसेनाला 5.87, काँग्रेसला 1.3 आणि भाजपला 0.98 टक्के मते मिळाली होती. तेेलगू देसम 17, भाजप 6, तर जनसेना पक्ष 2 जागांवर निवडणूक लढत आहे. काँग्रेसने माकप आणि भाकप यांना हाताशी धरून तिसरी आघाडी तयार केली आहे. प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला कडप्पा मतदार संघातून त्यांचा चुलतभाऊ अविनाश रेड्डी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान शर्मिला 2019 मध्ये त्यांचे काका आणि खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करून माझ्या भावाच्या पक्षाला मतदान करू नका, असे आवाहन मतदारांना करत आहेत. खा. रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी अविनाश रेड्डी वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. विशेष म्हणजे जगनमोहन यांनी कडप्पातून त्यांनाच उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, कडप्पातील लढतीकडे सार्‍या आंध्र प्रदेशचे लक्ष लागले आहे.

वायएसआर काँग्रेस राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढत आहे. 2019 मध्ये याच सत्तारूढ पक्षाने 25 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांची पाटी तेव्हा कोरडी राहिली होती. या दोन्ही पक्षांना यावेळी खाते खोलण्याची अपेक्षा आहे. तेलगू देसमशी युती केल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होण्याची आशा संभवते. यावेळी भाजप, तेलगू देसम आणि जनसेना असे तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत.

रहस्यमय हत्येमागील गूढ कायम

जगनमोहन यांचे काका (स्थानिक भाषेत बबई) आणि कडप्पा मतदार संघाचे खासदार विवेकानंद रेड्डी यांची 14 मार्च 2019 रोजी त्यांच्या घरात हत्या करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी जगनमोहन यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आंध्र प्रदेशच्या राजकारणात हा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news