…आणि शवागारातील ‘मृतदेह’ झाला जिवंत!

…आणि शवागारातील ‘मृतदेह’ झाला जिवंत!

ब्राझिलिया : 'मृत' घोषित केलेल्या व्यक्ती अंत्यसंस्कारावेळी जिवंत झाल्याची अनेक उदाहरणे देश-विदेशात आहेत. खरे तर या लोकांचा मृत्यूच झालेला नसतो; पण काही कारणामुळे त्यांना गफलतीने मृत समजले जात असते. मात्र, मृत समजली गेलेली एखादी व्यक्ती अचानक उठून बसली तर सभोवताली असलेल्या जिवंत गर्दीवर प्रेतकळा येऊ शकते हे गफलत करणार्‍यांच्या लक्षात येत नाही! आता असाच एक प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे. तिथे शवागारात ठेवलेले 'शव' अचानक जिवंत झाले.

रुग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबीय त्यांना घेऊन जाईपर्यंत तो मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला जातो. या मृतदेहांमध्ये राहून शवागारात काम करणे यासाठी मोठे धाडस लागते. त्यामुळे येथे काम करणार्‍या कामगारांना धाडसी समजलं जातं. पण जर शवागारात कधी एखाद्या मृतदेह अचानक जिवंत झाला तर भलेभले हादरून जातात. ब्राझीलच्या साओ जोस प्रादेशिक रुग्णालयात असेच काहीसे घडले.

90 वर्षीय नॉर्मा सिल्वेरा दा सिल्वा यांचा 25 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीय घरी घेऊन जाईपर्यंत त्यांचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवागारात एका पिशवीत ठेवण्यात आला होता. मात्र, काही तासांनंतर शवागारातील कर्मचार्‍याने बॅग उघडताच नॉर्माचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मृतदेह पुन्हा डॉक्टरांकडे नेला. येथे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली नॉर्मा दोन दिवस जिवंत राहिली; परंतु त्या बेशुद्ध होत्या आणि 27 नोव्हेंबर रोजी अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नॉर्मासाठी दोन मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आली.

स्थानिक मीडिया रिपोर्टस्नुसार, हॉस्पिटलचे अधिकारी, ब्राझीलचे मेडिकल एथिक्स कमिटी आणि डेथ कमिशन याचा तपास करत आहेत की त्या जिवंत असूनही त्यांना शवागारात कसे पाठवले गेले. नॉर्माची मैत्रीण जेसिका मार्टिन्स सिल्वी परेरा म्हणाली की, नॉर्माचे कुटुंब आता हॉस्पिटलविरोधात याचिका दाखल करण्याची योजना आखत आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा बॅग उघडली तेव्हा नॉर्मा अत्यंत हळूवारपणे श्वास घेत होती. ती शुद्धीत नसल्यामुळे तिला मदतीसाठी हाक मारता आली नाही, तिने श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि वेदनेने विव्हळत राहिली. रात्री 11:40 ते 1:30 पर्यंत तिला मृत घोषित केल्यापासून ती बॅगमध्ये गुदमरत होती, असे जेसिका म्हणाली. तसेच, नॉर्माच्या कुटुंबीयांना अद्याप मृत्यूचे कारण सांगण्यात आलेले नाही, असेही तिने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news