राज मार्ग दुधारी
ज्ञानेश्वर बिजले
मशिदीवरील भोंग्याचा मोठा आवाज येतो, ते भोंगे हटवा, हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला, आणि अनपेक्षितपणे त्याचे पडसाद देशभर उमटले. वैशाखात वणवा पेटतो म्हणतात, आता हा वणवा किती भडकतो, ते लवकरच दिसून येईल. या मुद्दयाला हिंदुत्वाचीही एक किनार आहे. मात्र हा राज मार्ग दुधारी आहे, याची जाणीव सर्वांनाच ठेवावी लागेल, अगदी राज ठाकरे यांना सुद्धा.
मुळात राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे. राजकीय पक्षांनी लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग शोधले पाहिजेत. मात्र, गेली काही वर्षे अन्य मुद्द्यांनाच प्राधान्य मिळाल्याचे दिसून येते. राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, हा भोंग्याचा मुद्दा राजकीय वातावरण ढवळून काढत आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा कोणत्या पक्षाचा..
राज यांच्या भूमिकेमागे भाजप असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे काही नेते करीत आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पूर्वी भाजप-शिवसेना युतीचा होता. त्यांची युती तुटली. भाजपला हा मुद्दा त्यांच्याकडेच ठेवायचा आहे. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मदतीने सत्ता मिळाली आहे. मात्र, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडायला तयार नाही. भाजपलाही शिवसेनेवर आक्रमकतेने वार करता येत नाही. अशा परिस्थितीत मनसे हा तिसरा पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाला चांगला टीआरपी आहे. त्यांच्या भाषणाला गर्दी होते. मनसे आणि शिवसेनेत पराकोटीचे मतभेद आहेत. त्यामुळे, मनसेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच होईल. सध्या तरी या दोन पक्षांत युतीची शक्यता नाही. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यासाठी या तिन्ही पक्षांत स्पर्धा रंगणार आहे.
देशपातळीवर उठलेल्या प्रतिक्रिया
हनुमान चालिसा मुख्यत्वे उत्तर भारतात म्हटली जाते. भोंगे सुरू राहिल्यास, त्यासमोर भोंगे लावून मोंठ्या आवाजात हनुमान चालिसा पठण करावे, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. उत्तरप्रदेशात काही मशिदीवरील भोंगे काढण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांत फिरु लागल्या आहेत. बिहारमध्ये भाजपच्या मंत्र्यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हा नॉन इश्यू आहे, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तो तातडीने फेटाळला.
राज्य सरकारनेही सर्व पक्षीय बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे हे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, असे त्यांनी आज सांगितले. तसेच, मनसेविरुद्ध कारवाईची शक्यताही बोलून दाखविली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार होते. गेले आठवडाभर दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. या कारवाईतून राज्य सरकारची दिशा स्पष्ट होते.
औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीमांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनीच पालन करण्याची विनंती त्यांनी केली. हा वाद मनसे आणि राज्य सरकार यांच्यातील असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. मनसे ही भाजपचीच टीम असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचवेळी, काँग्रेस सर्वधर्म समभावाची भूमिका घेत आहे. भोंग्यावर सगळीकडे कारवाई झाली असल्यामुळे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनविण्याचा प्रयत्न थांबवावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे. त्यांचे नेते शरद पवार यांच्यावरच गेले काही दिवस राज ठाकरे घणाघाती टिका करीत आहेत. त्यातच गृहखातेही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे, चार मेपासून राज्यात ठिकठिकाणी भोंग्यावरून वादाची परिस्थिती निर्माण झाली, तर कारवाईची भूमिका राज्य सरकारला म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसलाच घ्यावी लागेल. त्याचे पडसाद राज्यात, तसेच देशाच्या राजकारणावरही पडतील.
मनसेचा फायदा काय?
मुळात मनसेची राजकीय पक्ष म्हणून अवस्था बिकट झाली होती. त्यांचे अनेक सहकारी पक्ष सोडून अन्य पक्षांत गेले. गेल्या दहा वर्षांत राज ठाकरे यांची भूमिका सातत्याने बदलली. कधी भाजपला पाठिंबा, तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सलोखा, तर आता त्यांच्याविरुद्धच कठोर भुमिका. धरसोड वृत्ती, तसेच पक्षसंघटनेकडे प्रारंभीच्या काळात केलेले दुर्लक्ष याचा फटका राज ठाकरे यांनी बसला. सध्या ते संघटना बांधणीकडे, तसेच कार्यकर्त्यांशी थेट संपर्काकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत. मात्र, आता तसा थोडा उशीरच झाला आहे. भोंग्याच्या मुद्द्यामुळे मनसे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
मात्र, मनसेची सर्वांत जमेची बाजू आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांचे भाषण. ते प्रभावीपणे, प्रेक्षकांना पटेल अशा पद्धतीने मुद्दे मांडण्याची त्यांची हातोटी. सध्या ते एकला चलो रे ची भूमिका घेत आहेत. मात्र, अनेक कार्यकर्त्यांना भाजपचा आधार हवा आहे. शिवसेना व मनसेमधील वाद मिटण्याची शक्यता नाही. राज्यातील भाजपचे नेते मनसेला जवळ घेण्याच्या मनस्थितीत सध्या तरी नाहीत. शरद पवार यांच्यावर टीका केल्याने, राष्ट्रवादी आता दुरावला आहे. अशा कठीण राजकीय परिस्थितीत मनसेला वाटचाल करायची आहे.
मुंबई, ठाणे, लगतच्या महापालिका, पुणे, नाशिक या महानगरांमध्ये मनसेचे अस्तित्व आहे. त्यामुळे, तेथील निवडणुकांवर लक्ष देताना स्थानिक मुद्द्यांनाही राज ठाकरे यांनी हात घातला पाहिजे. सध्या ते देशपातळीवरील मुद्दे मांडताना दिसतात.
अयोध्येकडे प्रयाण
राज ठाकरे कार्यकर्त्यांसह पाच जूनला अयोध्येला राममंदीरात दर्शनासाठी जाणार आहेत. योगायोगाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाच जून रोजी पन्नासाव्वा वाढदिवस. त्या दिवशी या दोन नेत्यांची गळाभेट होईल. सध्या पक्षाचा भगवा ध्वज घेऊन खांद्यावर भगवी शाल पांघरलेले राज ठाकरे हे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात. कार्यकर्त्यांनी त्यांना हिंदूजननायक ही उपाधीही बहाल केली आहे. मात्र, महाराष्ट्र तुलनेने पुरोगामी विचाराचा आहे. त्यामुळे, हिंदुत्वाच्या आधारे जादा मते मिळण्याऐवजी भ्रमनिरास होण्याचीच शक्यता अधिक आहे. याचा फायदा मनसेपेक्षा भाजपला उत्तरेकडील राज्यात होईल.
राज मार्ग दुधारी ठरणार का?
मुख्यत्वे अक्षय तृतिया आणि रमजान ईद हे दोन्ही समाजाचे सण 3 मे रोजी आहेत. गुढीपाडव्यापासून गेले महिनाभर भोंग्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. आता मनसेचे कार्यकर्ते चार मेपासून काय भूमिका घेणार, त्यासंदर्भात पोलिसांकडून होणारी कारवाई यांवर पुढील दिशा ठरत जाणार आहे. हा राज मार्ग तसा दुधारी आहे. त्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष चर्चेत आला असला, तरी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी या मुद्द्याचा किती उपयोग होणार, त्याचा पक्ष नेतृत्वाला विचार करावा लागेल.