पिंपरी : प्रचाराच्या धुरळ्यात स्टार प्रचारकांनी फोडला घाम; दररोज बदलताहेत राजकीय गणिते

पिंपरी : प्रचाराच्या धुरळ्यात स्टार प्रचारकांनी फोडला घाम; दररोज बदलताहेत राजकीय गणिते

किरण जोशी

पिंपरी : महाविकास आघाडीत अनपेक्षितपणे झालेली बंडखोरी, निवडून येण्याच्या महत्त्वाकांक्षेने सर्वच उमेदवारांनी लावलेला प्रचाराचा जोर, त्यातच भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी 'शतप्रतिशत' भाजपची गर्जना करून फुंकलेले महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांचे रणशिंग; यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 'हायटेंशन मोड'ला येऊन पोहोचली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या धुरळ्यात कार्यकर्ते, उमेदवारांसह स्टार प्रचारकांनीही घाम फोडला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर होत असलेली ही पोटनिवडणूक अश्विनी जगताप यांच्या रूपाने बिनविरोध होण्याची शक्यता होती मात्र, इतर निवडणुकांचे दाखले देत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची विनंती झुगारून नाना काटे यांना उमेदवारी दिली आणि पोटनिवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. त्यातच गतवेळी आ. जगताप यांना काट्याची टक्कर देणारे राहुल कलाटे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने ही तिरंगी लढत लागली. या निवडणुकीत केवळ स्थानिक राजकीय आखाडे बांधले जात असतानाच राज्यातील राजकारण विकोपाला गेल्याने याचेही पडसाद या पोटनिवडणुकीमध्ये उमटू लागले आहेत.

ही केवळ पोटनिवडणूक म्हणून मर्यादित न राहता, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्थानिकांची लिटमस टेस्ट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खर्‍या अर्थाने राजकीय रंग भरला.

संपूर्ण बहुमताचे भाजपचे आव्हान!

भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी नुकताच पुणे आणि कोल्हापूरचा दौरा केला. या वेळी त्यांनी संपूर्ण बहुमताने भाजप सत्तेत येण्याचा नारा देऊन एकप्रकारे विरोधकांना आव्हान दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा त्यांनी समाचार घेतला. पोटनिवडणुकीच्या वातावरणात या वक्तव्यामुळे विरोधकांनाही जोर आल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यास त्यांची भाजपची घोडदौड रोखता येऊ शकते, या रणनीतीने महाविकास आघाडी कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, फौजिया खान, वंदना चव्हाण, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंढे, सुनील शेळके आदी.

मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री गुफ्तगू

आपली विनंती राष्ट्रवादीने ऐकली नाही म्हणूनच की काय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चिंचवडच्या प्रचारात ईर्षेने सहभाग घेतला आहे. सोमवारी पुण्यातील प्रचाराची धामधूम संपल्यानंतर ते रात्री दोनच्या सुमारास लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी चक्क तासभर जगताप कुटुंबीय आणि पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर पहाटे 4 पर्यंत ते खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी होते. सध्याच्या राजकीय वातावरणात चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज आल्यानेच मुख्यमंत्र्यांकडूनही रात्रीचा दिवस केला जात असल्याचे दिसून येत आहे.

पवार अन् फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला

लक्ष्मण जगताप यांनी भाजपसाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि पक्षासाठी चिंचवडमधील विजय महत्त्वाचा असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून ते स्वत: प्रचारामध्ये उतरले आहेत. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा पिंपरी-चिंचवड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नेते-कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याबरोबरच प्रचारात हयगय होऊ नये, यासाठीही ते काळजी घेताना दिसत आहेत.फ

बदलताहेत राजकीय गणिते!

पिंपरी-चिंचवडमधील सर्वच निवडणुकांमध्ये नात्या-गोत्याचे राजकारण महत्त्वाची भूमिका बजावते. पक्ष बाजूला ठेवून कोण कोणाला ताकद देते यावरही निवडणुकीचे निकाल अवलंबून असतात. या निवडणुकीतही अशीच स्थिती आहे. मतदानाची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतसे वरून अन् आतून कोण कोणाला मदत करीत आहे, हे स्पष्ट होऊ लागल्यामुळे प्रमुख दावेदारीची गणितेही दररोज बदलत आहेत.

थेट जळगावमध्ये बॅनर!

गतवेळी दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले राहुल कलाटे यांना अपक्ष उमेदवार म्हणून साहजिकच स्टार प्रचारकांचा पाठिंबा मिळत नसला तरी निवडणूक लढविण्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्मार्ट प्रचार करून निवडणुकीतील विजयाचे दावेदार म्हणून वातावरणनिर्मिती केली आहे. मित्रपक्ष नसला तरी इतर पक्षांतील मित्रांची मदतही त्यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. खान्देशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे थेट जळगावात बॅनर लागले आहेत. स्मार्ट प्रचाराची अनुभूती यातून मिळत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news