मधुबाला : सौंदर्यसम्राज्ञीची अधुरी प्रेमकहाणी; १४ फेब्रुवारीचा जन्म आणि हृदयानेच केले बेजार!

मधुबाला : सौंदर्यसम्राज्ञीची अधुरी प्रेमकहाणी; १४ फेब्रुवारीचा जन्म आणि हृदयानेच केले बेजार!

मधुबाला…रुपेरी पडद्याला पडलेले एक नितांतसुंदर स्वप्न! आपल्या आरसपानी सौंदर्याने या अभिनेत्रीने आजपर्यंत प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. 'द व्हिनस ऑफ इंडियन स्क्रिन' असे बिरुद देऊन पाश्चात्यांनी गौरवलेल्या या मदनिकेने अनेक चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा अमीट ठसा उमटवला. सौंदर्य हे शापित असते असे म्हणतात. अलौकिक सौंदर्याची सम्राज्ञी असलेल्या मधुबालाबाबत ते खरेच ठरले. 14 फेब्रुवारी 1933 मध्ये मधुबालाचा दिल्लीत जन्म झाला. 'व्हॅलेंटाईन डे' ज्या दिवशी साजरा केला जात असतो, त्या 14 फेब्रुवारीला ही सौंदर्यसम्राज्ञी जन्मली. 'व्हॅलेंटाईन डे' म्हणजे हृदयाची भाषा बोलण्याचा दिवस. या दिवशी जन्मलेल्या मधुबालास हृदयानेच आयुष्यभर बेजार केले…भावनिकद़ृष्ट्याही आणि शारीरिकद़ृष्ट्याही! 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त मधुबालाच्या प्रेमकथेची आणि शोकांतिकेची ही कथा…

मधुबालाचे अत्यंत मनमोहक हास्य आजही फुलांची उधळण केल्यासारखे किंवा गुलाबदाणीतील सुगंधाचा शिडकावा केल्यासारखे ताजेतवाने करीत समोर येत असते. खरे तर तिचे आयुष्य अवघे 36 वर्षांचे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या महिन्यातच म्हणजे 23 फेब्रुवारी 1969 ला तिने या जगाचा निरोप घेतला. मात्र, तिचे अस्तित्व आजही तिच्या अनेक चित्रपटांमधून, अनेक ठिकाणी सतत झळकत असलेल्या तिच्या सुंदर छबीच्या पोस्टर्समधून आणि तिच्यावर चित्रित झालेल्या अनेक गाण्यांमधून अजरामर राहिलेले आहे. हॉलीवूडमध्ये मर्लिन मन्राेचे हास्य, तिची चंचल छबी, उत्स्फूर्त अभिनय लोकांना मोहवत होता व आजही मोहवतो. मधुबाला आणि मर्लिनमध्ये या सर्व गोष्टींमध्ये साम्य आहे. दोघींचा मृत्यूही ऐन तारुण्यातच झाला. दोघींनाही ज्या प्रेमाची आस होती, ती कधी पूर्ण झाली नाही. मधुबाला तर जिवंतपणीच यातना भोगत मृत्युमुखी पडली. तिच्या हृदयाला जन्मतःच छिद्र होते.

उपजतच हे दुखणे घेऊन आलेल्या मधुबालाने लहान वयापासूनच घरही सांभाळले हे विशेष! दिल्लीतून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आपले भले मोठे कुटुंब घेऊन आलेल्या अताउल्लाह खान यांच्या या 'मुमताज जेहान बेगम देहलवी' नावाच्या चिमुरड्या लेकीने वयाच्या आठव्या वर्षापासूनच कॅमेर्‍यासमोर अभिनय करण्यास सुरुवात केली. चित्रपटसृष्टीतील अनेकांचे 'बारसे' करणार्‍या देविकाराणी यांनीच तिलाही 'मधुबाला' हे नाव दिले. मात्र, त्यापूर्वी ती 'बेबी मुमताज' या नावाने बालकलाकार म्हणून काम करू लागली होती. 'बॉम्बे टॉकिज'च्या 'बसंत' या 1942 मध्ये आलेल्या चित्रपटात बेबी मुमताज सर्वप्रथम पडद्यावर दिसली. 1945 च्या 'फुलवारी' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने पहिल्यांदा रक्ताची उलटी केली. त्यावेळी तिच्या या आजाराचे निदान झाले होते. मात्र, जणूकाही 'डेथ वॉरंट' घेऊन आलेल्या या रक्ताच्या उलटीने तिचा उमलू पाहणारा चित्रपट प्रवास थांबला नाही.

सोहराब मोदी यांच्या 'दौलत'मध्ये तिला पहिल्यांदा प्रमुख भूमिका मिळाली; पण हिरोईन म्हणून तिचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता केदार शर्मा यांचा 'नील कमल'. 1947 च्या या चित्रपटातील तिचा नायक होता राज कपूर. राजचाही हा पहिलाच चित्रपट! या दोघांनीही नंतर मागे वळून पाहिले नाही. मधुबालाने आपल्या 1942 ते 1964 पर्यंतच्या दीर्घ कारकिर्दीत 72 चित्रपट केले. 'महल'मुळे तिला खर्‍या अर्थाने स्टारडम मिळाले जे अखेरपर्यंत कायम राहिले. तराना, अमर, मिस्टर अँड मिसेस 55, कालापानी, हावडा ब्रीज, चलती का नाम गाडी, बरसात की रात, हाफ टिकट यासारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले. मात्र, तिच्या कारकिर्दीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'मुघल-ए-आझम'. त्यामधील अनारकलीच्या भूमिकेत मधुबाला अक्षरशः होम ग्राऊंडवरच होती. यामधील सलिमच्या भूमिकेत तिचा नायक होता दिलीप कुमार. मधुबालाचे नाव दिलीप कुमारपूर्वी प्रेमनाथ, भारत भूषण आणि प्रदीप कुमार यांच्याशी जोडले गेले होते.

या तिघांनीही तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, पण तसे घडले नाही. दिलीप कुमारबरोबर मधुबालाने 1951 चा 'तराना', 1952 चा 'संगदिल' आणि 1954 चा 'अमर' चित्रपट केला होता. दोघांची जोडी पडद्यावरही सुंदर दिसली आणि पडद्यामागेही त्यांची प्रेमकहाणी फुलली. ही प्रेमकहानी नऊ वर्षे सुरू राहिली होती. एकदा तर अशी वेळ आली होती की दिलीप कुमार यांनी 'आजच माझ्याशी लग्न कर' असेही मधुबालाला सांगितले होते. मात्र, लहान वयापासूनच कुटुंबाची जबाबदारी पेलत असलेल्या मधुबालाला वडिलांच्या इच्छेबाहेर जाऊन कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा नव्हती. अताउल्लाह खान यांचा या दोघांच्या प्रेमाला विरोध होता. अखेर या प्रेमकहानीचा 'ट्रॅजिक एंड' बी. आर. चोप्रा यांच्या 'नया दौर' चित्रपटावेळी झाला. या चित्रपटासाठी त्यांनी दिलीप कुमार आणि मधुबाला या लोकप्रिय जोडीला साईन केले होते. मात्र, अताउल्लाह खान यांनी नंतर लेकीला आउटडोअर शूटिंगसाठी मुंबई सोडून अन्यत्र पाठवण्यास नकार दिला व हे प्रकरण शेवटी कोर्टातही गेले. तिथे दिलीप कुमार यांनी बी. आर. चोप्रा यांची बाजू घेतली.

मात्र, भर कोर्टातही दिलीपने आपले मधुबालावर प्रेम असल्याचे कबूल केले होते. बी. आर. चोप्रा यांनी अखेर या चित्रपटातून मधुबालास डच्चू दिला आणि वैजयंतीमालास घेतले. 'नया दौर'मुळे दिलीप कुमार आणि मधुबालाच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यावेळी 'मुघल-ए-आझम'चे शूटिंग सुरू होते. दोघे एकत्र शूटिंग करीत, पण एरवी एकमेकांशी चकार शब्दही बोलत नसत. चित्रपटातील तो पिसाचा मखमली सीन आजही लोकप्रिय आहे. हे सुंदर द़ृश्य पडद्यावर साकार असतानाही दोघांमध्ये बातचित बंद होती, हे आज कुणाला सांगूनही पटणार नाही! मात्र दोघेही किती दिग्गज कलाकार होते हे यामधून दिसून येते. कालांतराने मधुबालाच्या आयुष्यात किशोर कुमार यांची एंट्री झाली आणि तिने फारसा विचार न करता किशोरशी लग्न केले.

मधुबालाची धाकटी बहिण मधुर भूषण यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, लग्नानंतरही मधुबाला दिलीप कुमार यांना विसरू शकली नाही. ती शेवटच्या आजारपणात घरीच प्रोजेक्टरवर 'मुघल-ए-आझम' पाहत असे. आपण पुन्हा एकत्र चित्रपट करू असे दिलीप कुमार यांनी तिला म्हटले होते, पण तो योग काही येणार नव्हता हे दोघांनाही ठावूक होते. 'मुघल-ए-आझम'मध्ये सलीमला सोडून मृत्यूच्या दिशेने एक एक पाऊल टाकत जाणार्‍या अनारकलीच्या भावूक द़ृश्याला लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाण्याने वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. 'खुदा निगेहबान हो तुम्हारा, धडकते दिल का पयाम ले लो, तुम्हारी दुनिया से जा रहे है, उठो हमारा सलाम ले लो…' मधुबालाही मृत्यूच्या हवाली होत होती. ती गेली त्यावेळी दिलीप कुमार चेन्नईत शूटिंग करीत होता. तिच्या मृत्यूची खबर कळताच तातडीने तो मुंबईकडे निघाला…तो कब्रस्तानात पोहोचला त्यावेळी 'अनारकली'ला 'सुपूर्द-ए-खाक' करण्यात आले होते!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news