जहाजासमोर आला न्यूयॉर्कच्या तिप्पट मोठा हिमनग…

जहाजासमोर आला न्यूयॉर्कच्या तिप्पट मोठा हिमनग…

लंडन : 'कधीही न बुडणारे जहाज' अशी जाहिरात करून निघालेले टायटॅनिक आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर अटलांटिक महासागरात बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेला एक हिमनग जबाबदार होता. हिमनगाचे टोक जितके दिसत असते त्यापेक्षा अनेक पटीने मोठा आकार पाण्याच्या खाली असतो. त्यामुळे असे हिमनग नेहमीच जहाजांसाठी धोकादायक ठरत असतात. आता एका जहाजासमोर न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट मोठ्या आकाराचा हिमनग आला आणि जहाजातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला! या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

'आरआरएस सर डेव्हिड अटेनबरो' या बि-टिश पोलार जहाजापुढे एकाएकी महाकाय हिमनग आला आणि जहाजावर असणार्‍या प्रत्येकाच्याच छातीत धडकी भरली. मुळात ठरल्या मार्गाने हे जहाज पुढे नेत असताना ज्याची शक्यता होती तेच झाले आणि समोर जगातील एक चमत्कारच उभा ठाकला. ग्रेटर लंडनच्या दुप्पट आणि न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट आकाराच्या या हिमनगाचे नाव 'ए 23 ए' असे आहे.

साधारण 3,900 चौरस किलोमीटर अर्थात 1500 चौरस मैल इतके क्षेत्रफळ असणारा हा हिमनग नेमका किती मोठा असेल याचा अंदाज तुम्हाला लावता येतोय का? 1986 ला अंटार्क्टिकच्या किनार्‍यावरून हा हिमनग वेगळा झाला आणि बराच काळ तिथंच अडकून पडला होता. पण आता मात्र पाण्याचा प्रवाह आणि वार्‍याच्या दाबामुळे तो थेट वेडेल सी पर्यंत येऊन पोहोचल्याची माहिती तज्ज्ञ देतात.

गेल्या 37 वर्षांमध्ये हा हिमनग आता पुढे पुढे सरकत असल्यामुळे यावर संशोधकही नजर ठेवून आहेत. हा हिमनग जवळ येत असतानाच जहाजावर असणार्‍या कर्मचार्‍यांनी त्याचा एक थरारक व्हिडीओ टिपला, ज्यासंदर्भातील माहिती बि-टिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या वतीने देण्यात आली. इतका मोठा आणि भव्य स्वरूपातील हिमनग प्रत्यक्षात पाहणे अविश्वसनीय असल्याचीच प्रतिक्रिया जहाजावरील प्रमुख संशोधक डॉ. अँड्र्यू मिजर्स यांनी दिली. येत्या काळात हा हिमनग पुन्हा एकदा जॉर्जियाच्या दक्षिणेकडील बेटांकडे स्थिरावणार असून, अंटार्क्टिकातील वन्यजीवसृष्टीसाठी चिंतेची बाब ठरू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news