किम जोंगकडून ध्रुवीकरणाचा प्रयत्न!

किम जोंगकडून ध्रुवीकरणाचा प्रयत्न!

एकंदरीतच जागतिक पटलावर उघडपणाने ध्रुवीकरण होताना दिसत आहे. एकीकडे चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणांमुळे चिंतेत सापडलेला देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत असून, त्यातून 'क्वाड'सारख्या संघटनांचा जन्म होत आहे, तर दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या आशिया-प्रशांत क्षेत्रातील वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि एकंदरीतच जागतिक दादागिरीमुळे संतापलेले देश चीन आणि रशिया यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत. किम जोंग उन यांचा रशिया दौरा याच ध्रुवीकरणाचा एक भाग आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा सध्याच्या जगातील एक माथेफिरू हुकूमशहा म्हणून ओळखला जातो. त्याच्या विचित्र आणि क्रूर कृत्यांच्या कहाण्या या जागतिक पटलावरील चर्चेचा विषय ठरतात. हा हुकूमशहा उठता-बसता जगाला अण्वस्त्र हल्ल्यांच्या धमक्या देताना दिसतो. हायड्रोजन बाँबसारख्या विनाशकारी आणि महासंहारक अस्त्रांच्या चाचण्या घेऊन, उपद्रवमूल्य जगाला दाखवून देण्यामध्ये किम जोंग उनचा हात कुणीच धरू शकणार नाही. वास्तविक, अत्यंत गरिबीने-उपासमारीने ग्रासलेला देश म्हणून उत्तर कोरिया ओळखला जातो. उत्तर कोरिया हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे, जो अनेक दशकांपासून अन्नटंचाईचा सामना करत आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांनी घेतलेल्या उपग्रह प्रतिमांनुसार, उत्तर कोरियात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सुमारे 1 लाख 80 हजार टन कमी अन्नधान्याचे उत्पादन झाले आहे. 2022 मध्ये एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अन्नाच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने देशातील नागरिकांना कमी अन्न खाण्यास सांगितले होते. परंतु, या देशाच्या आर्थिक विकासाकडे आणि लोककल्याणकारी प्रकल्प राबवण्याकडे लक्ष देण्याऐवजी जागतिक पटलावर सतत असुरक्षितता निर्माण करण्यामध्ये किम महाशयांना अधिक स्वारस्य असल्याचे दिसते. चीनसारख्या जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या देशाला किम जोंग उनसारखे माथेफिरू आणि आक्रमक गर्जना करणारे प्यादे आपल्या हाताशी ठेवणे नेहमीच सोयीचे राहिले आहे. या दोन्हींमधील समान धागा म्हणजे अमेरिकेशी शत्रुत्व. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हा जागतिक राजकारणातला एक सिद्धांतच बनला आहे. त्यामुळे जो तो देश आपल्या शत्रूच्या शत्रूशी सलगी करताना दिसत आहे. त्यातून अनेक नवी समीकरणेही जागतिक राजकीय पटलावर आकाराला येताना दिसताहेत. मध्यंतरी इराण आणि सौदी अरेबिया या कट्टर हाडवैर असणार्‍या देशांमध्ये चीनच्या मध्यस्थीने घडून आलेली समेट जगाने पाहिली. या सर्वांमध्ये अमेरिकाद्वेष किंवा अमेरिकेला शह देण्याची मानसिकता, हा पाया असल्याचे दिसून येते.

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शत्रुत्वाचे कारण 50 वर्षे जुने आहे. खरे तर कोरियन युद्धादरम्यान रशिया आणि चीनने उत्तर कोरियाला पाठिंबा दिला होता, तर अमेरिका दक्षिण कोरियाच्या पाठीशी उभी होती. एवढेच नाही, तर आपली ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने उत्तर कोरियावर बाँबफेकही केली होती. तीन वर्षांनंतर युद्धविराम झाला. तोपर्यंत उत्तर कोरिया उद्ध्वस्त झाला, याबाबत उत्तर कोरियामध्ये अमेरिकेबद्दल संताप आहे.

आता याच अमेरिकाद्वेषातून उत्तर कोरिया आणि रशियाच्या मैत्रीसंबंधांना बहर आला आहे. अलीकडेच किम जोंग उनने त्याच्या विशेष बुलेटप्रूफ ट्रेनमधून थेट रशियाला भेट दिली आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला. या ट्रेनमधून रशियातील कॉस्मोड्रोम येथे तो पोहोचला, तेव्हा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्याचे स्वागत केले. गडद हिरव्या रंगाच्या या ट्रेनचे नाव तायेंघो असून, कोरियन भाषेमध्ये त्याचा अर्थ सूर्य असा होतो. या ट्रेनमध्ये सुमारे 15 डबे असून, ते सर्वच्या सर्व बुलेटप्रूफ आहेत. या ट्रेनचे वजन सामान्य गाड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे ही ट्रेन ताशी 50 किलोमीटर वेगाने धावू शकते. त्यामुळे किम जोंग उन यांना 1 हजार 180 किलोमीटरचा प्रवास करून रशियात जाण्यासाठी 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. तसेच रशियन सीमेवर येताच किम जोंग उनच्या ट्रेनची सर्व चाके बदलावी लागली कारण उत्तर कोरिया आणि रशियाचा रेल्वे मापक वेगळा आहे. किम जोंग उनची ट्रेन ही लक्झरी आणि भव्य जीवनशैलीचे एक अद्भुत उदाहरण आहे. या दौर्‍यादरम्यान उत्तर कोरिया आणि रशियामध्ये एक अनोखा करार होणार आहे. या करारानुसार, किम रशियाला त्याच्या देशातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवणार आहे, तर त्या बदल्यात पुतीन उत्तर कोरियाला अन्नधान्य पुरवठा करणार आहेत. उत्तर कोरियाकडून शस्त्रे आणि दारूगोळा रशियाला पाठवला जात आहे.

दुसरीकडे, उत्तर कोरिया रशियाच्या सुरक्षेच्या हितासाठी साम—ाज्यवादी शक्तिंविरुद्धच्या पवित्र लढ्याला पूर्ण पाठिंबा देत आहे, अशी घोषणा किम जोंग उन यांनी केली आहे. वास्तविक, रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील लष्करी सहकार्यामुळे दक्षिण कोरियाची चिंता वाढली आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून आण्विक शस्त्रे, क्षेपणास्त्रे किंवा उपग्रहप्रणाली विकसित करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांच्या विरोधात आहे, असे सांगत दक्षिण कोरियाने रशियाला इशारा दिला आहे. 2019 मध्येही त्यांनी पुतीन यांची रशियातील बंदर-शहर व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर ही बैठक पार पडली होती. तथापि, आताच्या भेटीला युक्रेन युद्धानंतरची बदललेल्या भूराजकीय स्थितीची पार्श्वभूमी आहे. जागतिक पटलावर उघडपणाने ध्रुवीकरण होताना दिसत आहे. किम जोंग यांचा रशिया दौरा याच ध्रुवीकरणाचा भाग आहे. ही सर्व परिस्थिती जगाला पुन्हा महायुद्धाकडे घेऊन जाईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. किम जोंगसारखे माथेफिरू हुकूमशहा महायुद्धाची ठिणगी कधीही पाडू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news