मिरज; पुढारी वृत्तसेवा : सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा सांगली शहर पोलिसांना निनावी फोन आला आणि पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सर्व यंत्रणा मिरज आणि सांगली रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. परंतु हे पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सांगली शहर पोलिसांना सोमवारी रात्री सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. यानंतर तत्काळ पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सुधीर भालेराव, रेल्वे सुरक्षा दलाचे बाजीराव कडाळे, लोहमार्ग पोलिसचे संभाजी काळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाला. तसेच बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस दलाचे बॉम्बशोधक पथक तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे बॉम्बशोधक पथकाकडून रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. पोलिस अधीक्षकांसह फौजफाटा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र एकच गोंधळ उडाला होता. परंतु सांगली पोलिसांचे हे मॉकड्रील असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांना बॉम्ब ठेवण्याचा फोन आला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांसह सर्व यंत्रणा मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाली. दोन रेल्वे गाड्यांची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून 45 मिनिटांचे मॉकड्रील करण्यात आले.