Amit Thackeray : महाराष्ट्राचे “नवनिर्माण’ घडू दे! अमित ठाकरेंकडून नाशिकमध्ये गणरायाला साकडे

अमित ठाकरे,www.pudhari.news
अमित ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी मंगळवारी (दि.२६) नाशिकमध्ये आलेल्या मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नाशकातील सुमारे ३८ सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत गणरायाला महाराष्ट्राच्या 'नवनिर्माणा'चे साकडे घातले. अमित ठाकरे दोनदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. परंतु हा दौरा एका दिवसातच आटोपता घेत ते रात्री १० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेत ठाकरे व शिंदे गट तर राष्ट्रवादीत शरद पवार व अजित पवार गटात संघर्ष सुरू असताना मनसेने मात्र या निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. राज ठाकरेंनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण दौऱ्यानंतर आता राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे. नाशिक लोकसभेची जबाबदारी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे  (Amit Thackeray) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये आपले दौरे वाढविले आहेत. गेल्या पंधरवड्यात नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर मंगळवारी(दि.२६) पुन्हा अमित ठाकरे नाशिकमध्ये हजर झाले. सकाळी १० वाजता त्यांचे सिन्नरमध्ये आगमन झाले. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या भेटीगाठी सुरू केल्या. सिन्नर येथून भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी व इंदिरानगर, पाथर्डी भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांनी भेटी देत दर्शन घेतले.

अनेक मंडळांनी अमित ठाकरे यांच्या हस्ते गणेश आरतीदेखील केली. यानंतर रात्री १० च्या सुमारास अमित ठाकरे दौरा आटोपत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या दौऱ्यात मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते सलीम शेख आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news