Aarey Metro Car Shed : ‘आरे कारशेड’ च्या मुद्द्यावर राज ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरें सोबत

Aarey Metro Car Shed : ‘आरे कारशेड’ च्या मुद्द्यावर राज ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरें सोबत

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नवे सरकार सत्तेवर येताच आता पुन्हा 'आरे मेट्रो कारशेड'चा (Aarey Metro Car Shed) मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असे दिसते आहे. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी आरे कॉलनी येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Ekanath Shinde) यांनी शपथ घेतल्या नंतर आरे मध्येच मेट्रोचे कारशेड होईल अशी घोषणा केली. यानंतर कारशेडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरे कारशेड रद्द करण्यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका होती. नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने पुन्हा एकदा पर्यावरणवादी व शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. आता यामध्ये राज ठाकरे (Raj thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आदित्य ठाकरें (Aditya thackeray) सोबत असल्याचे दिसत आहे. अमित ठाकरे यांनी पत्र लिहून नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आरे कारशेडचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने हा मुद्दा चांगलाच तापणार असे दिसते आहे.

अमित ठाकरे यांचे पत्र (Aarey Metro Car Shed)

नवे सरकार स्थापन झाल्यावर राज ठाकरे यांनी नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री यांना पत्र लिहून आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड करु नये व या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी असे लिहले आहे.

मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरण प्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडे तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.

पुढे अमित ठाकरे पत्रात म्हणतात, आपल्याला विकास हवाच आहे. पण, पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही. याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.

मेट्रो कारशेड बाबत नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा (Aarey Metro Car Shed)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर असताना मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतील जंगलात करण्याचे मंजूर करण्यात आले होते. यानंतर या प्रोजक्टला पर्यावरणवाद्यांनी प्रचंड विरोध केला होता. पर्यावरणवादी या संदर्भात न्यायालायत देखिल गेले होते. त्यावेळी फडणवीस सरकारने एका रात्री या प्रकल्पासाठी २७०० झाडांची कत्तल देखिल केली होती. पर्यावरण वाद्यांसोबत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने सुद्धा या प्रकल्पाला विरोध केला होता.

२०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांचे सरकार गेले व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thackeray) यांनी पर्यावरणाचा विचार करुन आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. महाविकास आघाडीचे सरकार पाडत शिवसेनेतून बंड करुन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करत स्वत: मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होत एकनाथ शिंदे यांनी आरे येथे मेट्रोचे कारशेड होणार अशी घोषणा केली.

आरेतील मेट्रो कारशेडला मनसेचा विरोध (Aarey Metro Car Shed)

या घोषणेमुळे पुन्हा एकदा पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यात भाग घेत या प्रकल्पाला शिवसेनेने देखिल विरोध दर्शवला आहे. यात आता मनसेनेसुद्धा भाग घेत पर्यावरणासाठी आरेतील मेट्रो प्रकल्पाला विरोध केला आहे. तसेच या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे पत्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news