Amin Sayani : रेडिओ विश्वातील ध्रुव तारा

Amin Sayani : रेडिओ विश्वातील ध्रुव तारा
Published on
Updated on
'बिनाका गीतमाला' या रेडिओवरील लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या हिंदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमामुळे लाखो श्रोत्यांची मने जिंकणारे अमीन सयानी यांच्या जाण्याने एका पर्वाचा अस्त झाला आहे. निसर्गतः लाभलेली भारदस्त आवाजाची देणगी, त्याला सादरीकरणातील माधुर्याची जोड आणि अस्खलित हिंदी भाषेतील शब्दसंपदेमुळे अमीन यांचा हा कार्यक्रम रेडिओच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला.
रेडिओच्या दुनियेचे जादूगार आणि सर्वसामान्यांमध्ये हे माध्यम लोकप्रिय करणारे अमीन सयानी यांच्या जाण्याने एका पर्वाचा अस्त झाला आहे. संवादक्रांती, माहितीचा प्रस्फोट आणि इंटरनेटचे युग इतकेच या सर्वांपासून कोसो दूर असणार्‍या काळाच्या आठवणी ज्यांच्या मनात आजही रुंजी घालतात, त्या साधारणतः पन्नाशीच्या पुढच्या पिढीला सयानी यांचे नाव कायमच स्मरणात असेल. माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल तर दूरच, आज ज्याला इडियट बॉक्स म्हटले जाते तो दूरचित्रवाणी संच म्हणजेच टेलिव्हिजनही मोजक्या घरांमध्ये असणार्‍या काळात रेडिओ हे सर्वांत प्रभावी श्राव्यमाध्यम होते. देशातील सर्वांचीच रोजची सकाळ ही रेडिओवरील बातम्या आणि गाणी ऐकण्याने व्हायची. त्या काळात म्हणजे 1950 च्या दशकात रेडिओवरील सिलोन या वाहिनीवर सयानी यांनी 'बिनाका गीतमाला' हा हिंदी चित्रपटांमधील आघाडीच्या गीतांचा कार्यक्रम सुरू केला. 1952 ते 1988 अशी सुमारे 36 वर्षे हा कार्यक्रम सिलोनवरून प्रसारित केला जात असे आणि लक्षावधी लोक त्याचा मनमुराद आनंद घेत असत. भारतीय चित्रपटगीतांचा हा पहिला रेडिओ शो होता आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिनाका गीतमालाची नोंद इतिहासात आहे. नव्वदीच्या दशकात ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारती सेवेतून हा कार्यक्रम प्रसारित होऊ लागला. त्याकाळच्या नोंदी असे दर्शवतात की, या कार्यक्रमाच्या श्रोत्यांची संख्या 20 लाखांहून अधिक होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सयानी यांच्यामार्फत केले जात असे. या कार्यक्रमामुळे सिलोन ही रेडिओ वाहिनी खूपच लोकप्रिय झाली आणि  सयानी हे  घराघरांमध्ये पोहोचले.
 सयानी यांच्या या अफाट लोकप्रियतेचे गमक म्हणजे त्यांचा गोड, लाघवी स्वरअंदाज. 'बिनाका गीतमाला'च्या सुरुवातीला त्यांचे 'बहनो और भाईयों' हे शब्द ऐकण्यासाठी हजारो जण आतुरलेले असत. कारकिर्दीत 50 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम करणारे असामान्य निवेदक म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. आजच्या काळात एफएम रेडिओ वाहिन्यांवर रेडिओ जॉकी ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे; पण साठ-सत्तर वर्षांपूर्वी सयानी यांनी ही भूमिका इतक्या प्रभावीपणाने पार पाडली की, आजही त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. साध्या सोप्या शब्दांमध्ये हिंदी चित्रपटगीतांमधील आशय उलगडतानाच्या त्यांच्या समरसपणामुळे श्रोत्यांना ते ऐकण्याची ओढ लागलेली असे. त्याकाळात रेडिओचा सिग्नल जाण्याची समस्या अनेकदा उद्भवत असे. 'बिनाका गीतमाला'च्या कार्यक्रमादरम्यान जर असा प्रसंग आला तर श्रोत्यांना चुटपूट लागून राहत असे. महाभारत या बहुलोकप्रिय मालिकेमध्ये 'मैं समय हूँ' हा आवाज सयानी यांचा होता.
सयानी यांच्या लोकप्रियतेचे मूल्यमापन रेडिओवर त्यांचा कार्यक्रम ऐकणार्‍यांची संख्या हे तर होतेच; पण त्याचबरोबर रेडिओच्या कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी दर आठवड्याला 50 हजारांहून अधिक पत्रे येत असत. अभिनेता शाहरुख खान, आमिर खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी रेडिओवर मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे सयानी यांना हिरो बनायचे होते. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याची कबुली दिली होती. रेडिओत निवेदक झाल्यावर अनेक कलाकारांच्या मुलाखती मी घेतल्या; मात्र हीरो बनण्याचे माझे स्वप्न कधीही पूर्ण झाले नाही, असे ते म्हणाले होते. सिनेमाच्या रुपेरी पडद्यावरचा नायक म्हणून जरी त्यांना झळकता आले नाही, तरी रेडिओच्या दुनियेतील लिजंड म्हणून ते अजरामर राहिले. त्यांचे स्थान ध—ुव तार्‍यासारखे अढळ आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news