अमेरिकन निवडणूक रंजक ठरणार?

अमेरिकन निवडणूक रंजक ठरणार?

पुढील वर्षी अमेरिकेमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची सध्या जगभरात चर्चा आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन महारथींमध्येच पुन्हा ही निवडणूक रंगेल असे मानले जात आहे. तथापि, अमेरिकेतील प्रणालीनुसार घेतल्या जाणार्‍या सर्वेक्षणांमध्ये बायडेन यांची लोकप्रियता घसरत चालल्याचे दिसत आहे. अर्थात, अमेरिकी निवडणुकीबाबत भाकित करणे खूप अवघड आहे.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या (2024) निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष जो बायडेन विरुद्ध माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असा मुकाबला होणार आहे. केवळ एक वर्षानंतर म्हणजे 5 नोव्हेंबर 2024 रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार आगामी निवडणूक ही अन्य अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे नसेल आणि या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या मते, 2024 मध्ये होणारी निवडणूक ही 1860 नंतर प्रथमच रंजक होत असून तत्कालीन काळात अब्राहिम लिंकन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. एका अर्थाने बायडेन आणि ट्रम्प यांच्या भोवतीच निवडणूक घुटमळणार आहे.

2020 ची अध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. निवडणुकीच्या काळात अमेरिकी राजधानीत कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला. एका अर्थाने अमेरिकी लोकशाही प्रणालीला गालबोट लागले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी हल्ला झाल्याचे अहवालात म्हटले आहे. बीबीसीच्या मते, 2024 ची निवडणूक ही 2020 चीच पुनरावृत्ती असेल आणि यात ट्रम्प आणि बायडेन हे एकमेकांविरुद्ध लढतील. मात्र, प्रसंगी त्यांची भूमिका उलट राहू शकते. आजघडीला 9 रिपब्लिकन, 4 डेमोक्रॅटस् आणि 2 स्वतंत्र उमेदवार हे अध्यक्षपदाच्या मैदानात आहेत; पण सरतेशेवटी बायडेन आणि ट्रम्प हेच आपापल्या पक्षाचे उमेदवार राहतील. डेमोक्रॅटिक पक्षाचा विचार केल्यास बायडेन यांना तिघांचा सामना करावा लागू शकतो. त्यापैकी एक रॉबर्ट एफ केनेडी (ज्युनिअर) यांचा समावेश आहे. ते स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. केनेडी यांची उमेदवारी ही कोणत्याही डेमोक्रॅटिक उमेदवारांची स्थिती आणि गणित खराब करू शकते. बहुतांश जणांंसाठी ट्रम्प हे 2024 च्या अध्यक्षपद निवडणुकीतील आवडीचे उमेदवार आहेत.

अर्थात, बायडेन आणि ट्रम्प यांच्यात फरक काय आहे? बायडेन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत आणि 2024 मध्ये ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. ट्रम्प यांना रिपब्लिकनच्या रूपातून निवडून येता येऊ शकते. मात्र, सहा महिन्यांपासून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ही गोष्ट बायडेन यांच्या पथ्यावर पडण्यासारखी आहे. सध्या महागाईत घट झाली आहे. रोजगारातील वाढ स्थिर आहे आणि शेअर बाजारात उसळी दिसून येते. बायडेन निवडून येत असतील, तर त्यांना निवडणुकीत दिलेले आश्वासने पाळावी लागणार आहेत. यात चीनबरोबर व्यापार करण्याबाबत इम्रिगेशनचे निर्बंध अधिक कडक करणे आणि मर्यादा लागू करणे याचा समावेश आहे. याशिवाय राजकीय अन्याय करणार्‍या लोकांचा राजकीय बदला घेण्याची इच्छाही बायडेन बाळगून असतील.

बायडेन यांना पक्षांतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. कारण, केवळ 66 टक्के डेमोक्रॅट मंडळी त्यांच्या परदेशी धोरणाच्या मुद्द्यावरून पाठीशी आहेत, तर 74 टक्के अर्थव्यवस्था व्यवस्थापनाला पाठिंबा देत आहेत. तसेच 81 टक्के त्यास अनुमोदन देत आहेत. वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीसाठी बायडेन यांची रणनीती ही 2020 चेच विषय पुन्हा उकरून काढण्याची आहे आणि ही बाब ट्रम्प यांच्यासाठी विरोधात्मक वातावरण तयार करणारी आहे. बायडेन आणि ट्रम्प यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत; मात्र 44 टक्के अमेरिकी नागरिक म्हणतात, बायडेन यांच्या राजवटीत देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. अमेरिका इस्रायल-हमास आणि युक्रेन यांच्या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी चीन, रशिया आणि इराण हे नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार करण्याचे काम करत आहेत. अर्थात, अमेरिकी निवडणुकीबाबत भाकित करणे खूप अवघड आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news