Amblyopia : आजार… दृष्टी मंदावण्याचा

Amblyopia : आजार… दृष्टी मंदावण्याचा

मूल जन्माला आले की, काही दिवसांनी आपल्या आजूबाजूचे जग न्याहाळू लागते; पण काही वेळा जन्मजात किंवा वाढीच्या काळात डोळ्यांमध्ये काही समस्या निर्माण होताना दिसतात. दृष्टी मंदावणे (Amblyopia) ही त्यापैकीच एक समस्या. वेळीच योग्य इलाजाने आपल्या बाळाची दृष्टी निकोप राहण्यास मदत होते.

अ‍ॅम्ब्लियोपिया (Amblyopia) म्हणजे मंद दृष्टी ही लहान मुलांमध्ये आढळून येणारी एक समस्या आहे. मुलांमधील या समस्येकडे वेळीच लक्ष दिले तर त्यांचे डोळ्यांचे आरोग्य नीट राहते; पण या आजाराचे निदान आणि उपचार वेळेत केले नाही तर मात्र योग्य नजर येत नाही. वाढत्या वयानुसार कमजोर दृष्टी वाढतच जाते. समोर येणार्‍या वस्तूचा अंदाज घेण्याची सवय मेंदूला जडते. त्यामुळे डॉक्टरांकडून तपासमी करून घेणे गरजेचे आहे.

अ‍ॅम्ब्लियोपिया (Amblyopia) म्हणजे दृष्टी मंदावणे. यामध्ये एका डोळ्याने सुस्पष्टपणे दिसत असते; पण त्याचवेळी दुसर्‍या डोळ्याने कमी दिसते. गडबड सरू होते ती मेंदूत. मेंदूमध्ये एकावेळी सुस्पष्ट आणि धूरकट प्रतिमा दिसतात. हळूहळू मेंदू धूरकट प्रतिमेचीच अपेक्षा करायला लागतो. सातत्याने असेच होत राहिल्यास दोन्ही डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो आणि सुस्पष्ट नजर असलेल्या डोळ्यांची नजर कमी होऊ शकते.

ज्या डोळ्याची नजर कमी आहे, त्याची दृष्टी हिरावू शकते किंवा डोळ्यातील तिरळेपणा वाढू शकतो आणि दोन्ही डोळे वेगळ्या दिशेला पाहू लागतात. त्याशिवाय काहींमध्ये आनुवांशिक आजारामुळेही दृष्टी मंदावते. तिरळेपणा, बाल्यावस्थेतील मोतीबिंदू किंवा ग्लुकोमा, मिटलेल्या पापण्या अशा काही गोष्टीही मंद दृष्टीला कारणीभूत ठरू शकतात.

तपासणी : या आजारापासून बचाव करण्यासाठी शाळेत जाण्याच्या वयात मुलांची तपासणी करून घेणे योग्य. त्यामध्ये मुलांच्या डोळ्यांमध्ये प्रकाशकिरणे सरळपणे जाताहेत की नाही, दोन्ही डोळ्यांची दृष्टी समान आहे का आणि दोन्ही डोळे एकसारखे सामान्य रूपात हालचाल करताहेत की नाही, या गोष्टी समजून येतात. यापैकी कोणत्याही पायरीवर काही समस्या असेल तर वेळ न दवडता उपचार सुरू केले पाहिजेत.

उपचार : दृष्टी सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे मंद दृष्टी असलेल्या डोळ्यानेच पाहणे. केवळ एकाच डोळ्याने पाहायचे असल्याने सुरुवातीला मुलाला त्रास होईल. दृष्टी सुधारण्यासाठी कालावधी अधिक लागू शकतो; पण डॉक्टरी सल्ल्याने योग्य प्रकारे हा इलाज करायला हवा.

पुढील काही लक्षणे दिसत असल्यास दुर्लक्ष करू नका.

* मुलांचे डोके दुखत असेल, जन्मानंतर काही आठवड्यांनतरही बाळाचे डोळे फिरत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डोळे आत जाणे किंवा बाहेर येणे, दोन्ही डोळ्यांच्या हालचाली एकत्रित न होणे, वस्तूंमधील अंतराचा अंदाज लावता न येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घ्या. आपल्या मुलाच्या डोळ्यांची दृष्टी कमी आहे, हे लक्षात आल्यावर उपचारात दिरंगाई नको.

वेळेवर आणि योग्य इलाज केल्यास दृष्टी योग्यप्रकारे विकसित होते. सात ते नऊ या वयानंतर याचा इलाज करणे अवघड होते. त्यामुळे शाळेला जाण्याच्या वयात मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच तपासणीनंतर काही विचित्र गोष्ट दिसली तर मात्र त्यावर ताबडतोब इलाज केला पाहिजे.

डॉ. मनोज कुंभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news