कोल्हापूर : बाजार समितीवर पुन्हा अशासकीय संचालक मंडळ?; निवडणूक लांबण्याचे संकेत

कोल्हापूर : बाजार समितीवर पुन्हा अशासकीय संचालक मंडळ?; निवडणूक लांबण्याचे संकेत

गुडाळ : आशिष ल. पाटील :  कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असला तरी ही निवडणूक पुन्हा लांबण्याचे संकेत असल्याने बाजार समितीवर अशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या चार दिवसांत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेले अशासकीय संचालक मंडळ नियुक्त करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने ऑगस्ट २०२० मध्ये राजीनामे दिल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीने बाजार समितीवर प्रथम शासकीय प्रशासक आणि नंतर १० ऑगस्ट २०२० रोजी माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जम्बो अशासकीय संचालक मंडळ नियुक्त केले. या संचालक मंडळाला वेळोवेळी तब्बल चारवेळा दिलेली मुदतवाढ २३ एप्रिल २०२२ मध्ये संपली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. त्यानुसार २९ जानेवारी २०२३ रोजी बाजार समितीसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर तीन सदस्यीय शासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. निवडणुकीसाठी अद्याप तीन महिन्यांचा अवधी असल्याने आणि बाजार समिती कार्यक्षेत्रातील अडीचशेहून अधिक ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्याने नव्याने होणार्‍या ग्रामपंचायत सदस्यांनी मतदार म्हणून दावा केल्यास बाजार समिती निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीवर अशासकीय संचालक मंडळ नियुक्तीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये तत्कालीन सरकारने कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये केलेल्या दुरुस्तीमुळे अशासकीय मंडळावर सात पेक्षा जास्त सदस्य नियुक्त करता येणार नाहीत त्यामुळे बाजार समितीवरील संभाव्य अशासकीय मंडळ सात सदस्यीय राहणार असल्याचे संकेत आहेत.

प्रकाश आबिटकर गटाचे निकम अध्यक्ष?

या अशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार प्रकाश आबिटकर यांचे भुदरगडमधील समर्थक कल्याणराव निकम यांची नियुक्ती करण्याची शिफारस थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पणनकडे केली आहे. उर्वरित सदस्यांची शिफारस भाजप, जनसुराज्य शक्ती आणि शिंदे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news