सांगली : भाकरी झाली मुलुखाची महाग

सांगली : भाकरी झाली मुलुखाची महाग

सांगली; नंदू गुरव :  जोंधळ्याला चांदणे लखडून जावे… हे कवितेत ठिक, पण चांदणे लखडल्यासारखा ज्वारीचा दर झाल्यावर जगायचे कसे? आज ज्वारीला सोन्याचा दर आल्याने गरीब सोडा, मध्यमवर्गीय माणूस पण भाकरीला महाग झालाय. जिरे दरवाढीने तडतडायला होते आहे. हळद-डाळींना दरवाढीची जबर फोडणी बसली आहे. वाढीव दर स्थिर होणार नाहीतच, उलट ते आणखी वाढत जाणार, असाच सध्याच्या बाजारभावाचा सांगावा आहे. येणार्‍या सणासुदीच्या दिवसात तर विचारायची सोय राहणार नाही.

हे खरेच आहे की, आजकाल जोंधळ्याची भाकर रोज कुणी खात नाही. काही वर्षापूर्वी फक्त सणासुदीलाच मिळणारी चपातीच खातात. म्हणूनच चुलीवरची भाकरी मिळेल, असे बोर्ड जागोजागी झळकलेत. ज्वारी पिकायची कमी झाली आणि मग तिला किंमत आली. आज ती 65 रुपये किलोवर गेलीय. ही दरवाढ 15 दिवसातील. ती आणखी वाढणाराय. एकतर बाजारातले जुने धान्य संपत चालले आहे आणि येणारे धान्य शेतातून बाजारात यायला दिवाळी व्हावी लागेल.

अर्थशास्त्र म्हणते पुरवठा कमी झाला की किंमत वाढते. या नियमाचा बाजारात थयथयाटच सुरू आहे. ज्वारीची मिजास वाढली तरी बाजरीने मात्र ती वाढू दिली नाही. बाजरी चार-पाच रुपयांनी स्वस्तच झालीय खरी, पण बाजरीची भाकर खातो कोण?
डाळ-भाकरी खाऊन दिवस काढले असे म्हणणाराही आता गपगार बसेल इतके दर वाढलेत. ज्वारीसोबत डाळीही महागल्यातच. तूरडाळ 150 रुपयेवरून 160 रुपये किलो झालीय. मसूर, हरभरा, मूग सार्‍याच डाळी किलोमागे दहा रुपयांनी वाढलेल्या आहेत. मूग गिळून गप्प बसल्याशिवाय दुसरा पर्याय तरी कुठाय?

गहू पण किलोमागे चार-पाच रुपयांनी महागलाय. आता सार्‍यांनीच किंमत वाढवून घेतल्यावर तांदळाला काही किंमत आहे की नाही? 35 पासून 150 रुपये असणारा नानाविध जातींचा तांदूळ किलोमागे 10-15 रुपयांनी वाढलाय. वीस रुपयांनी तेलाचे वरखाली सुरूच असते. गॅस काही कमी होत नाही. गॅस किरकोळ महागला तरी रस्त्यावर स्वयंपाकाचा फार्स करणारेच सत्तेत आल्यानंतर गॅस किती पटींनी वाढला? याविषयावर समाज माध्यमात यथेच्छ धुलाई केली जाते. सिलिंडरच्या दरांनी आणि धान्यांच्या महागाईने सारा संसारच गॅसवर
आहे.

असे आहेत दर

ज्वारीचे दर क्विंटलमागे सरासरी 500 रुपयांनी वाढून 4 हजार 500 ते 5 हजार 500 प्रति क्विंटलवर गेलेेत. दगडी, मालदांडी, शाळू -ज्वारी 45 ते 60 रुपये तर बार्शीची ज्वारी पासस्टीच्या ( 65 रुपये) घरात गेलीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news