चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर उघडणार; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर उघडणार; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
Published on: 
Updated on: 

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पूर्व प्राथमिक (नर्सरी) ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना दिल्या आहेत. यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. आदेशाचे पालन करण्याबाबत स्पष्ट केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अनेकविध कारणांमुळे मुले रात्री उशिराने झोपतात. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याने शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेतील लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सध्याची सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सात ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल तसेच सकाळची पालकांची धावपळही कमी होईल, असे राज्यपाल यांनीही अलीकडेच सूचना दिल्या होत्या. यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात केला. अभिप्राय, विविध शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर शाळा 9 नंतर भरवण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाच्या निर्णयात म्हटले आहे.

व्यवस्थापनांसाठी सूचना…

राज्यातील सकाळी 9 पूर्वी भरणार्‍या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक असून ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 च्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी तसेच शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, अशाही सूचना दिल्या आहेत. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल, त्यांच्या अडचणी प्रकरणपरत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी / शिक्षण निरिक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरणपरत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी. तसेच याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी घ्यावी, अशा सूचनाही या शासन निर्णयात दिल्या आहेत.

तज्ज्ञांच्या अभ्यासात समोर आलेल्या गोष्टी

– राज्यातील बहुतांश शाळा, विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा सकाळी 7 किंवा त्यानंतर असल्याचे दिसून आले.
– आधुनिक युगातील बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपतात.
सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसून आला.
– पालकांच्या मते पाल्याची झोप पूर्ण न झाल्याने ते शाळेसाठी लवकर उठण्यासाठी तयार नसतात.
– अपुर्‍या झोपेमुळे विद्यार्थी आळसावलेले दिसून येतात. अभ्यासासाठी आवश्यक असणारा उत्साह त्यामुळे कमी होतो.
– हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते. अनेक विद्यार्थी आजारी पडतात.
– सकाळी मुलांना लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे पालकांची ओढाताण होते.
– सकाळी लवकर भरणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news