एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

सरकारी रुग्णालयांत सर्व तपासण्या, उपचार मोफत; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांत राज्यातील नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्याही मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, कॅन्सर हॉस्पिटल यांसोबतच नाशिक आणि अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सर्व प्रकारचे उपचार आणि तपासण्या मोफत करण्याचा
निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला दिलेल्या उत्तरावेळी केली. सद्यस्थितीमध्ये राज्यातील सुमारे 2 कोटी 55 लाख नागरिक या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

राज्यातील 2 हजार 418 रुग्णालयात सुविधांचा लाभ

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2 हजार 418 आरोग्य संस्था असून या सर्व ठिकाणी रुग्णांना निःशुल्क उपचार मिळणार आहेत. त्यांना या ठिकाणी उपचार तसेच रक्त, सोनोग्राफी, सिटीस्कॅन आदी तपासण्यासाठी कोणतीही शुल्क द्यावी लागणार नाही. यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news