आंतरराष्‍ट्रीय : पुतीनशाहीचे बळी

आंतरराष्‍ट्रीय : पुतीनशाहीचे बळी

आपल्या राजकीय विरोधकांना किंवा आपल्या भूमिकेशी असहमती दर्शवणार्‍यांना, आपल्या ध्येयधोरणांना विरोध करणार्‍यांना केवळ अस्मान दाखवण्यातच नव्हे, तर अस्मानात पाठवण्याची कृत्ये पुतीन यांच्या इशार्‍याने झाल्याचे जगाने पाहिले. पुतीन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगामध्ये गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. या हत्येमागे पुतीन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जगभरातील विविध देशांचे आणि त्यांच्या नेतृत्वाचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे पाहण्याचे वेगवेगळे द़ृष्टिकोन आहेत. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर रशियाचे विरोधक देश त्यांचा उल्लेख क्रूरकर्मा, नवे हुकूमशहा, खुनशी, रक्तपिपासू अशा अनेक उपाधी देऊन करत असतात; तर रशियाशी मैत्री असणार्‍या काही देशांना पुतीन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षणही वाटते. रशियाबरोबरच जगभरात त्यांच्याविषयीच्या अनेक सत्यकथा, दंतकथा, किस्से चर्चिले जातात. त्यातील तथ्यांश लक्षात घेऊन सारांश काढल्यास पुतीन हे 'कोल्ड ब्लडेड' असल्याचे दिसते.

अशा स्वभाव प्रकृतीच्या व्यक्ती वरकरणी शांत, सुस्वभावी दिसत असल्या, तरी त्यांची धोरणे आक्रमक असण्याची शक्यता असते. किंबहुना, उथळपणाने वागणार्‍या, बोलघेवड्या नेतृत्वांपेक्षा अशा व्यक्तींचा आक्रमकपणा हा अतिसंहारक असण्याची शक्यता अधिक असते, असे मानसशास्त्र सांगते. पुतीन यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये याची प्रचिती अनेकदा दिली आहे. अलीकडच्या काळातले याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे युक्रेनवर केलेले महाआक्रमण. फेब्रुवारी 2022 मध्ये पुतीन यांनी तडकाफडकी जोरदार आक्रमण केल्यानंतर नितांतसुंदर अशा युक्रेनची अवस्था आज अक्षरशः बकाल झाली आहे. या युद्धामध्ये आजवर असंख्य लोकांचा बळी गेला असून, लाखो लोक निराधार, आसराहीन आणि भयावह अवस्थेत ढकलले गेले आहेत. इतके होऊनही पुतीन यांनी युक्रेनबाबत एकदाही सौहार्द, संवेदनशीलता दाखवलेली नाही. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेसा अंदाज येतो.

आपल्या राजकीय विरोधकांना किंवा आपल्या भूमिकेशी असहमती दर्शवणार्‍यांना, आपल्या ध्येयधोरणांना विरोध करणार्‍यांना केवळ अस्मान दाखवण्यातच नव्हे, तर अस्मानात पाठवण्याची कृत्ये पुतीन यांच्या इशार्‍याने झाल्याचे जगाने पाहिले. काही महिन्यांपूर्वी 'वॅगेनर आर्मी'ने रशियामध्ये लष्करी बंड पुकारत मॉस्कोपर्यंत मजल मारली होती. या आर्मीचे प्रमुख येवगनी प्रिगोझिन हे पुतीन यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी होते. पुतीन यांच्याच पुढाकारामुळे प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखाली वॅगेनर आर्मी खासगी सेना रशियात उदयास आली. प्रिगोझिन महाशयांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती. यासंदर्भातील एका प्रकरणात अटकेत असलेल्या प्रिगोझिन यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रेस्टॉरंट आणि वाईन शॉपही उघडले. त्या काळात उपमहापौर असलेले पुतीन त्या रेस्टॉरंटमध्ये जायचे. त्यानंतर दोघांतील मैत्री हळूहळू वाढू लागली.

रशियामध्ये अधिकृत पाहुण्यांसाठी जेवणाचे कंत्राट प्रिगोझिन यांना देण्यात आले. नंतरच्या काळात प्रिगोझिन पुतीन यांचा 'राईट हँड' बनले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असो किंवा आफ्रिका, मध्य पूर्वेतील युद्धे लढणार्‍या भाडोत्री सैनिकांच्या निर्दयी टोळी असोत, ही कामे प्रिगोझिन यांच्या खासगी सैन्याने केली. या भाडोत्री सैनिकांना पुतीन यांची शॅडो आर्मी म्हटले जात असे; पण पुतीन यांच्या विरोधातील बंडानंतर येवनगी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली; पण तो अपघात नसून घातपात होता, हे पुतीन यांची कारकीर्द ठाऊक असणार्‍या प्रत्येकाला माहीत होते. दोन वर्षांपूर्वी युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह सापडला होता. त्यापूर्वी ग्रेटाने पुतीन यांच्यावर सार्वजनिकरीत्या टीका केली होती आणि त्यानंतरच ती बेपत्ता झाली होती.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा सलग चौथा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे. रशियात लवकरच निवडणुका होणार आहेत. युक्रेन युद्धानंतर रशियामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पुतीन यांनी या निवडणुकीत भाग घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान मध्यंतरी रशियन टी.व्ही. पत्रकार एकतेरिना डंटसोवा या पुतीन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची बातमी आली होती. मात्र, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

निवडणूक आयोगाने अर्जातील 'चुका' निदर्शनास आणून देत त्यांची उमेदवारी नाकारली. तत्पूर्वी, चाळीस वर्षीय एकतेरिना डंटसोवा यांनी पुतीन यांच्यावर सडकून टीका केली होती. पाश्चात्त्य माध्यमांमध्ये एकतेरिनाबद्दल असे बोलले जात होते की, निवडणुकीत पुतीन यांना पराभूत करण्याची क्षमता तिच्यात आहे; पण त्यांना परदेशी एजंट ठरवून निवडणुकीतूनच बाद करण्यात आले. पुतीन कोणत्याही परिस्थितीत आपल्या विरोधकांना किंवा टीकाकारांना सोडत नाहीत, ही बाब आता सर्वज्ञात झाली आहे. आजघडीला पुतीन यांच्या भीतीमुळे अनेक रशियन नेते परदेशात राहतात, अनेक जण तुरुंगात आहेत. अनेक मीडिया रिपोर्टस्मध्ये पुतीन यांच्यावर टीकाकारांच्या मृत्यूचा आरोप करण्यात आला आहे. अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आले आहेत.

सध्या अशाच एका गूढ मृत्यूमुळे व्लादिमीर पुतीन जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुतीन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगामध्ये गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. या हत्येमागे पुतीन यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुतीन यांनी आतापर्यंत आपल्या विरोधकांना मारण्यासाठी 'नोविचोक' या विषाचा वापर केल्याचा दावा केला जातो.

'नोविचोक' हे एक रासायनिक अस्त्र आहे. या विषाचे निदान करणे कठीण मानले जाते. त्यामुळे जेव्हा एखाद्यावर या विषाचा प्रयोग केला जातो, तेव्हा त्याचा बचाव होणे जवळपास अशक्य असते. 1970 ते 1980 या काळात नोविचोक नर्व एजंट हे फोलिएंट विकसित करण्यात आले होते. मार्च 2018 मध्ये ब्रिटनच्या सैलिसबरी शहकात स्किरपाल आणि त्यांच्या मुलीवर या विषाचा प्रयोग करण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने रशियावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. 'नोविचोक' विषाची बाधा झाल्यास अंग प्रचंड दुखणे, हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास अशा अडचणी जाणवतात. विष जास्त दिले असल्यास दोन मिनिटात मृत्यू होतो; पण विषाचे प्रमाण कमी दिले असल्यास प्रचंड वेदना होऊन मृत्यू होतो. पुतीन यांची आपल्या विरोधकांना संपवण्याची आजवरची कार्यपद्धती आणि त्यांचा कोल्ड ब्लडेड स्वभाव पाहता 'नोविचोक'चा वापर करून नवाल्नींना यमसदनी धाडण्यामध्ये त्यांचा हात असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक, पुतीन यांच्या या स्वभावामुळे संपूर्ण रशियामध्ये त्यांची दहशत आहे.

एकचालकानुवर्तीपणाने पुतीन यांनी संपूर्ण रशियामध्ये अघोषित हुकूमशाही राबवली आहे. तेथे पुतीन यांना विरोध करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण असे मानले जाते. मात्र, तरीही अलेक्सा नवाल्नी यांनी पुतीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप करत या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. विशेष म्हणजे, या आंदोलनाला जनतेचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. मध्यंतरी जर्मनीत असताना त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला तेव्हा पुतीन यांच्याकडेच संशयाची सुई वळली होती. या विषप्रयोगातून नवाल्नी बचावले. त्यानंतर त्यांनी पुन्हा पुतीन यांच्या विरोधातील आंदोलन पुढे नेले. या आंदोलनाची वाढती व्याप्ती आणि रशियन समाजातून नवाल्नींना मिळणारा पाठिंबा लक्षात घेऊन पुतीन सरकारने त्यांना अटक केली आणि 19 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय रशियन जनतेला रुचला नाही; पण पुतीनशाहीपुढे कुणाचेच काही चालले नाही. गतवर्षी त्यांना विशेष तुरुंगात हलवण्यात आले होते. वास्तविक, त्याचवेळी त्यांच्या जीवाला धोका असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या संशयास्पद मृत्यूने अखेर ती खरी ठरली आहे.

नवाल्नी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला, असे पुतीन प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी त्यांची हत्याच झाल्याचा आरोप नवाल्नी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 'नोव्हाया युरोप' या रशियाची देखरेख करणार्‍या वेबसाईटने नवाल्नींसोबत तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या हवाल्याने या मृत्यूबाबत एक नवा दावा केला आहे. त्यानुसार, नवाल्नी यांच्या मृत्यूची माहिती 16 फेब्रुवारीला देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू त्यापूर्वीच झाला होता. सर्वप्रथम तेथून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले आणि त्यानंतर नवाल्नींच्या मृत्यूची माहिती जगाला देण्यात आली. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते नवाल्नी यांना रशियातील ज्या पोलर वुल्फमध्ये कैद करण्यात आले होते, तो सर्वात धोकादायक तुरुंग मानला जातो. येथे कोणत्याही कैद्याशी संपर्क साधणे फार कठीण आहे. यासाठी मॉस्कोमध्ये उपस्थित व्लादिमीर पुतीन सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागते.

नवाल्नी यांच्या मृत्यूमुळे रशियामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याचे कारण रशियात होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अवघ्या एक महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्ये 15 ते 17 मार्चदरम्यान निवडणुका होणार आहेत. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती ठीक होती. नवाल्नींची ऑनलाईन सुनावणी 15 फेब्रुवारीला झाली, ज्याचा व्हिडीओ टेलिग्रामवर शेअर केला जात आहे. यात नवाल्नी विनोद करताना दिसले होते. न्यायाधीशांना 'तुमच्या निर्णयामुळे माझे पैसे संपत आहेत. तुमच्या पगाराचा काही भाग मलाही द्या,' असे ते गमतीने म्हणताना दिसले. असे असताना एकाएकी त्यांचा मृत्यू होणे ही बाब पूर्णपणे संशयास्पद आहे. जगभरातील उदारमतवादी आणि मानवतावादी कार्यकर्ते नवाल्नींच्या हत्येचा निषेध करीत आहेत. नवाल्नींना सार्वत्रिकपणे श्रद्धांजली वाहता येऊ नये, यासाठी पुतीन राजवटीने दबाव आणला होता. तो झुगारून देऊन हजारोंच्या संख्येने लोक घराबाहेर पडले.

व्लादिमीर पुतीन यांनी 2020 मध्ये स्वतःला 2036 पर्यंत सत्तेवर राहता यावे, अशाप्रकारे घटनादुरुस्ती करून घेतली आहे. स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा विक्रम पुतीन करणार आहेत. वास्तविक, कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतिपदाचे दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहू शकणार नाही, अशी तरतूद रशियाच्या घटनेत होती; पण पुतीन यांनी ती बदलली. पुतीन हे ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. या खेळात आक्रमकतेबरोबरच डावपेचही असतात आणि हे दोन्ही आत्मसात करून त्यांनी सत्तेत टिकून राहण्याचा स्वतःचा मंत्र बनविला. राजकारणामध्ये सत्तापदाची महत्त्वाकांक्षा असण्यामध्ये गैर काहीच नाही. परंतु, लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये कायदेशीर मार्गाने जनमताचा कौल स्वीकारून सत्तेचा सोपान चढण्याची रचना आहे; पण या व्यवस्थेमध्ये विरोधक नावाचा घटकच अस्तित्वात ठेवायचा नाही, याला हुकूमशाहीची सुरुवात म्हटले जाते. वर्तमान जागतिक राजकारणामध्ये असे प्रयोग वाढत चालले आहेत, ही बाब लोकशाहीप्रेमींसाठी चिंतेची आहे. चीनमध्ये शी जिनपिंग यांनी तहहयात राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी घटनादुरुस्ती करून घेतली आहे; तोच प्रकार पुतीन यांनी केली आहे. इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनीही न्यायपालिकेच्या अधिकारांचा संकोच करणारा कायदा करून त्याच दिशेने पाऊल टाकले होते; परंतु यासंदर्भातील घटनादुरुस्ती तेथील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

रशियामध्ये पुतीन यांच्या दहशतीपुढे सर्वच घटनात्मक यंत्रणांनी मान टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे नवाल्नी यांच्यासारख्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करण्यात पुतीन यांना कोणतेच भय वाटत नाही. नवाल्नी हे पुतीनशाहीतील भ्रष्टाचार, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दडपशाही यांच्या विरोधात आवाज उठवीत रशियामध्ये एक परिवर्तन आणू इच्छित होते. ते सर्वसामान्यांची भाषा बोलत होते. मात्र, कडवट सत्य ऐकून स्वत:मध्ये दुरुस्ती घडवून आणणे हुकूमशहांच्या प्रवृत्तीत नसते. आपल्या विरोधकांची मुस्कटदाबी करून दडपशाहीने त्यांचा आवाज दाबून टाकण्यात ते धन्यता मानतात. याचे कारण हुकूमशहा हे आतून भेदरलेले असतात. ही एकप्रकारे कंसाचीच मानसिकता म्हणायला हवी. आपण केलेल्या अनन्वित अत्याचारांच्या पापाचा घडा कधी ना कधी भरणार आहे, याची कल्पना असल्याने भेदरलेले हुकूमशहा आपल्या कंसप्रवृत्तीने अनेक निरपराधांना चिरडून टाकत असतात. चीनमध्ये अलीकडील काळात जिनपिंग यांच्या विरोधकांबाबतही असाच प्रकार घडताना दिसला.

रशियातील पुतीनशाही असो वा चीनमधील जिनपिंगशाही असो, त्यांच्या या एकाधिकारशाही आणि अत्याचारशाहीविरोधात असंतोषाची आकाशवाणी आज ना उद्या होणार, हे निश्चित आहे. ती होईल तेव्हा लोकशाहीचा सूर्य तेजस्वीपणाने झळकेल. कारण, हुकूमशाही प्रवृत्ती ही लोकशाहीला अंधारात ढकलणारी आहे. लोकशाहीच्या मूलतत्त्वांना तिलांजली देणारी आहे. विरोधकांशिवाय लोकशाहीला अर्थ नाही. महात्मा गांधी असे म्हणत असत की, 100 जणांपैकी एका व्यक्तीचे मत जर विरोधातील असेल, तरी ते मी विचारात घेईन. म्हणूनच आज ते जगद्वंदनीय ठरले; पण सत्तेच्या लालसेने हपापलेल्या पुतीन, नेतान्याहू, जिनपिंग यांच्यासारख्या हुकूमशहांना गांधी विचार कोण समजावून सांगणार?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news