विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या अक्षय करनेवार याने मणिपूर विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केले. सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेत विदर्भने मणिपूरचा १६७ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात अक्षय करनेवारने ४ षटके टाकली. त्यातील ४ पैकी ४ ही षटके त्याने निर्धाव टाकली. याचबरोबर दोन विकेट देखील घेतल्या. आजपर्यंतच्या टी २० इतिहासात ४ पैकी ४ षटके निर्धाव टाकण्याची करामत कोणी केली नव्हती. त्यामुळे या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद अक्षय करनेवारच्या नावावर झाली.
ही वर्ल्ड रेकॉर्डवाली कामगिरी अक्षय करनेवार याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवली. त्याने मंगळवारी झालेल्या सिक्कीम विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. त्याने सिक्कीमच्या कोडंदा अजित कार्तिक, क्रांती कुमार, आशिष थापा आणि निलेश लामिचाने यांना पाठोपाठ बाद करत हॅट्ट्रिक साधली. विशेष म्हणजे याही सामन्यात त्याने अत्यंत कमी धावा देण्याचा आपला शिरस्ता कायम ठेवला. त्याने ४ षटकात एक निर्धाव षटक टाकत ५ धावा देत तब्बल ४ विकेट घेतल्या.
हेही वाचा :
गेल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात विदर्भने प्रथम फलंदाजी करत सिक्कीमसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर विदर्भने सिक्कीमला २० षटकात ८ बाद ७५ धावा असे रोखत सामना १३० धावांनी खिशात टाकला. विदर्भने यंदाच्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीत दमदार सुरुवात केली आहे. ते त्यांच्या प्लेट ग्रुपमध्ये ५ सामन्यात २० गुण कमावत टॉपवर आहेत. विदर्भ नंतर मेघायल दुसऱ्या तर त्रिपुरा तिसऱ्या स्थानावर आहे.
अक्षय करनेवार याने पाच सामन्यात आतापर्यंत १० विकेट घेतल्या आहेत. त्याने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'सामन्यात गोलंदाजी करताना एकही धाव न देणे हे अविश्वसनीय आहे. ही सामन्य गोष्ट नाही मला खूप चांगले वाटत आहे.'