पुणे, पुढारी ऑनलाईन: गौतमी पाटील या नावाची कायम चर्चा होत असते. सध्या गौतमी चर्चेत आली आहे ती बैलासमोर केलेल्या डान्समुळे. गौतमी पाटील बैलासमोर केलेल्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या दरम्यान गौतमीने बैलासमोर केलेल्या नृत्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी "तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल, नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का एवढा त्रास होतोय", अशा शब्दांत मिश्किल टिपण्णी केली. पुणे जिल्ह्यातील मुळशीतील एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे . या कार्यक्रमावेळी बैलगाड्याचं प्रतीक म्हणून तिथं बैल बांधला होता.
या बाबत पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रम करणं हाच गौतमी पाटीलचा व्यवसाय आणि उपजीविकेचं साधन आहे. ती बैलासमोर नाचल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. बैलच काय ती गायीसमोर नाचू द्या. तो तिचा अधिकार आहे. लहान मुलाच्या वाढदिवसाला बोलवल्यावर देखील तिला नाचावच लागतं आणि शर्यतील किंवा बैल पोळ्याला बोलावलं तरीही तिला नाचावच लागतं. तिचं ते काम आहे आणि तिने ते करत राहावं, असं देखील पवार म्हणाले.
बाजार समितिच्या निवडणुकीच्या बाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अजित पवार बारामतीला गेले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात जत्रांचे दिवस सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जत्रा सुरु आहे. त्यामुळे काही गावांमध्ये तमाशे बोलावले जातात. लोक तामाशांना गर्दी देखील करतात. त्यातच सध्या महाराष्ट्रभर गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. त्यामुळे मतदान करा आणि रात्री पाटलीनबाईंना आणा, असं मी गंमतीत सुचवलं होतं. तिच्या कार्यक्रमासाठी लागणारी सुपारी परवडत असेल तर नक्कीच तिला बोलवावं असं अजित पवार म्हणाले.