हद्दवाढीसाठी एकजूट दाखवा : अजित पवार

हद्दवाढीसाठी एकजूट दाखवा : अजित पवार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : टोल माफ करण्यासाठी ज्याप्रमाणे कोल्हापूरकरांनी एकजूट दाखवली, सरकारला वाकवले, त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी एकजूट दाखवा, असे आवाहन करत हद्दवाढीला विरोध करू नका, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना घातली. हद्दवाढ झाल्यास स्मार्ट सिटीच्या धर्तीवर कोल्हापूरला निधी देऊ, असे सांगत, लोकांचेच प्रश्न सोडवण्याचा आमच्यावर दबाव होता. यामुळेच आम्ही सत्तेत गेलो, यात आमचे काय चुकले? असा सवाल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तपोवन मैदानात झालेल्या उत्तरदायित्व सभेत उपस्थित केला.

पवार म्हणाले, अनेकांना प्रश्न पडला असेल, आम्ही सत्तेत जाण्याचा का असा निर्णय घेतला? काहीजण सांगतात, आमच्यावर दबाव होता अशी बदनामी केली जाते. पण लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. अडीच वर्षांत सरकारमध्ये काम करताना हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. आमदारांची स्थगिती मिळालेली कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. विरोधी पक्षात असतो तर ही कामे झाली असती का? अन्य दुसर्‍या कोणता दबावाला भीक घालत नाही. आम्हीपण मराठ्याची औलाद आहोत. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी महायुतीत गेलेलो नाही, लोकहिताला प्राधान्य देणे हाच आमचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

मनात येईल ते कोल्हापूरकर करून दाखवतात

तुमच्या मनात जे येतं ते तुम्ही करून दाखवता, असे सांगत पवार म्हणाले, पुढची 50 वर्षे, पुढची पिढी डोळ्यासमोर आणा, जवळची गावे तातडीने शहरात घेतली नाही तर शहर भकास होईल. आम्ही तुम्हाला मदत करू, पण आपणही राजकारण न आणता, एकोपा दाखवा. हित साधा, असे आवाहन करत योग्य निर्णय योग्य वेळीच घ्यावे लागतात. तरच ते फायद्याचे ठरतात. त्याला उशीर झाला तर त्यात उपयोग होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच पक्ष, समाज, संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. अन्य कोणत्याही समाजाला न दुखावता, कुणालाही अडचण होऊ नये, यासाठी आम्ही सगळेच मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य मागास आयोगाचा पुनर्अभ्यास गट स्थापन करावा लागणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

अजित पवारांमुळे थेट पाईपलाईन मार्गी : मुश्रीफ

पंचगंगा ही कधीकाळी देशातील प्रदूषित नदीपैकी एक होती. यामुळे थेट पाईपलाईन योजना केली. यासाठी अजित पवारांनी 500 कोटींचा निधी दिला. ही योजना झाली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशी घोषणा त्यावेळी त्यांनी केल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, निधी देऊन शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. निराधार योजनेचे अनुदान दोन हजार रुपये केले जाईल. शेंडा पार्क येथे रुग्णालयांचा सातशे कोटींचा आराखडा केला आहे. या नव्या कामाच्या भूमिपूजनासाठी गृहमंत्री अमित शहांना आणण्याचे नियोजन आहे, असे सांगत कोणाला उत्तर देण्यासाठी नव्हे तर जिल्ह्याच्या विकासासाठी ही सभा असल्याचे सांगत त्यांनी भाषणाचा शेवट शायरीने केला.

जातीय, धार्मिक विद्वेष रोखण्यासाठी एकत्र या : भुजबळ

वेगवेगळ्या कारणांनी समाजात धार्मिक आणि जातीय विद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता सामाजिक एकोपा जपण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन करत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कोणत्याही कसोटीवर टिकेल, असेच आरक्षण द्या. परंतु इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये याची देखील खबरदारी घ्या, असे आवाहन केले.

लोकसभेच्या 48 जागा महायुतीच्याच : सुनील तटकरे

प्रत्येक निवडणूक आपण महायुतीसोबतच लढायची आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 48 जागांवर आपल्याला विजय खेचून आणायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याद़ृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिले.

पायताण हातात कधी घ्यायचे कोल्हापूरकरांना ठाऊक आहे : मुंडे

आम्ही ज्यांना दैवत समजतो, त्या दैवतासमोरच हसन मुश्रीफांसह आमच्या सर्वांवर टीका केली जात होती, असे सांगून कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, खालच्या पातळीवर जाउन टीका केली. पायताणापर्यंत विषय गेला. पण पायताण कसे बनवायचे, कसे घालायचे आणि वेळ पडलीच तर पायातलं काढून हातात केव्हा घ्यायचे हे कोल्हापूरकरांना माहिती आहे. यापुढे अशी टीका झाली तर कोल्हापूरची ही जनता टीकाकारांना माफ करणार नाही. असेही मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आदींची भाषणे झाली. स्वागत आदिल फरास यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार हसन मुश्रीफ यांनी केला. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आ. राजेश पाटील, आ. मकरंद पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, मानसिंग गायकवाड, माजी मंत्री आण्णा डांगे, पार्थ पोवार, राजू लाटकर, भैया माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पवारांची कोल्हापूरकरांना आश्वासने

* प्रोत्साहन अनुदानाची प्रलंबित यादी द्या, तत्काळ निधी देतो.
* शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाचा निधी मार्चअखेर.
* सारथी उपकेंद्रांसाठी 180 कोटी, दोन वसतिगृहे, मार्गदर्शन केंद्र.
* आयटीसाठी वातावरण तयार करावे लागेल, त्याला मदत करू.
* 'काळम्मावाडी'ची गळती रोखण्यासाठी 80 कोटींचा निधी देऊ.
* तालमींना डीपीडीसीतून निधी देण्याचा तत्काळ निर्णय घेऊ.
* अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्रासाठीही मास्टर प्लॅन करू; निधी देऊ.
* जोतिबा डोंगर, बाळूमामा मंदिराचा विकास करू.
* केएमटीला उभारी देऊ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news