पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. रविवार (दि.२९) त्यांना डेंग्यूचे निदान झाले होते. आज (दि.८) आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, "आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही." (Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,
"गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो."
राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवार (दि.२९) रोजी ट्विट करत म्हटलं होत की, "अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे प्रसारमाध्यमांकडून सांगितलं जात आहे. पण काल त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, पुन्हा त्यांचे कर्तव्ये पार पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने परततील."
हेही वाचा