अजित पवार तुमचे नेते तर त्यांना मान्यता द्या : छगन भुजबळ

अजित पवार तुमचे नेते तर त्यांना मान्यता द्या : छगन भुजबळ
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : अजित पवार तुमचे नेते आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि राष्ट्रवादीतील भांडणे सोडवून मोकळे व्हा, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर रविवारी टीकेचा भडीमार केला. तुम्ही येवल्यात येऊन माफी मागितली. गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार आहात, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'उत्तर' सभेत मंत्री भुजबळ यांनी अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो. कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. नवीन फळी उभी करायची असते, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत समन्वयाची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

अजितदादा आमचे नेते आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणणार, शरद पवार म्हणणार, तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा, आशीर्वाद देऊन वाद मिटवा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दिल्लीत जाऊन सत्ताधारी नेतृत्वाशी चर्चा करीत होते. मग आत्ताच का विरोध, असा सवाल त्यांनी केला.

या सभेत भुजबळ यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात, दुसरी बीडला तर तिसरी कोल्हापूरला झाली. आंबेगावला सभा होणार असे सांगितले, पण झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे, हे आजचा जनतेचा महासागर पाहून कळत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

अजित पवार आमचे नेते आहेत, असे म्हणता अन् काही तासांत भूमिका बदलता. तुम्ही आमचे दैवत, पण अशा भूमिका बदलण्याचा खेळ कशासाठी करता, असा सवाल भुजबळ यांनी शरद पवार यांना केला. मात्र त्यांचा थेट नामोल्लेख केला नाही.

आम्ही भाजपसोबत असलो तरी वंचित, उपेक्षित, ओबीसी, दीन- दलितांच्या प्रश्नावर लढण्याची भूमिका सोडलेली नाही. ज्यावेळी तुम्हाला काँग्रेसमधून बाहेर काढले तेव्हा एकमेव छगन भुजबळ तुमच्या बाजूने उभा राहिला. मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तरी साथ सोडली नाही. याची आठवण भुजबळ यांनी यावेळी करून दिली.

ही उत्तर सभा नव्हे तर बीड जिल्ह्याच्या जनतेच्या उपकाराचे उत्तरदायीत्व करण्याची सभा आहे, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला आजपर्यंत काय दिले? असा सवाल त्यांनी केला. मी जे बोलतो ते करतो, परंतू जे बोलत नाही तर तर नक्कीच करतो… अजित पवार हेच बीड जिल्ह्याचा खरा विकास करू शकतात, असा दावा त्यांनी केला.

राजकारणात काय घडले, काय नाही घडले… याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर "सवाल ईस बात का नही, शिशा बचा है की टुटा है। सवाल इस बात का है। पथ्थर कहासे आया?, लोगोने कोशीष की, मुझे मिठ्ठी मै दबाने की, लेकीन उनको मालूम नही, मैं बीज हूं", अशी त्यांनी शेरोशायरी देखील केली.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, रूपाली चाकणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आव्हाडांनी फडणवीस यांचे पाय धरले होते : मुश्रीफ

सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, ठाण्यात एकदा आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला असता तेव्हा ते गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले होते. एवढेच नव्हे तर निवडणूक न लढविण्याबाबतही बोलले होते. एक गुन्हा दाखल झाला म्हणून ते असे वागले होते. हा किस्सा मला जयंत पाटील यांनी सांगितला होता. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. जयंत पाटील आणि अजित पवारांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सभेत आव्हाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जे भाषण केले त्यात त्यांनी आमची संभावना गद्दार अशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे माझा राग अनावर झाला होता आणि मी कोल्हापूर पायताण प्रसिद्ध असल्याचे सांगितले, असेही मुश्रीफ म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news