पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. अजय जडेजा यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमधील समानता दर्शविली. पुढे ते म्हणाले जर संघाच्या प्रशिक्षक पदाची भूमिका मिळाली तर मला ती स्वीकारायला आवडेल. गेल्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने मोठ्या संघांना पराभूत करून सर्वांना चकित केले. अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. अफगाणिस्तानच्या या अविश्वसनीय कामगिरीमागे संघाचा मार्गदर्शक अजय जडेजाचा मोठा हात होता. (Ajay Jadeja)
अजय जडेजा यांना पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्यांनी उत्तर दिले की, जर मला ही भूमिका मिळाली तर मला ते करायला आवडेल. अजय जडेजा यांनी स्पोर्ट्स तकला सांगितले की, मी तयार आहे. मी माझे शिक्षण अफगाण लोकांसोबत शेअर केले आणि मला वाटते की पाकिस्तान देखील एकेकाळी अफगाणिस्तानसारखा होता. (Ajay Jadeja)
एकदिवसीय विश्वचषक 2023 अफगाणिस्तान संघासाठी खूप संस्मरणीय होता, परंतु दुसरीकडे, पाकिस्तान संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला आणि सलग पराभवांमुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. बाबर आझमच्या कर्णधारपदावर पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याला पायउतार व्हावे लागले, त्यानंतर पाकिस्तानने शाहीन आफ्रिदीला टी-20 आणि शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार बनवले.
पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तिथे संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. 1995 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी सामना जिंकला असला तरी पाकिस्तानने कधीही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलेली नाही.
हेही वाचा :