नगर: बुजविलेले ओढे-नाले पाहणार! महापालिका अधिकारी तक्रारदारासह स्पॉट व्हिजिट

नगर: बुजविलेले ओढे-नाले पाहणार! महापालिका अधिकारी तक्रारदारासह स्पॉट व्हिजिट

नगर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील ओढे-नाले बुजविल्याप्रकरणी तक्रारदारांनी स्पॉट व्हिजिटची मागणी केली. त्यानुसार आज मंगळवारी (दि.11) महापालिकेचे सहायक नगर रचनाकार व तक्रारदार स्पॉट व्हिजिट करणार आहेत. त्यानंतर तरी बुजविलेल्या ओढे-नाल्यांचा श्वास मोकळा होणार का, याबाबत पालिका वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

नगर शहरात लहान मोठे 21 ओढे होते. उपनगरामध्ये शहर वाढत चालल्याने अनेकांनी नैसर्गिक ओढे बुजवून अनधिकृत बांधकामे केली. तर, काही ठिकाणी ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला. नैसर्गिक ओढ्याची रूंदी कमी केली. सुमारे छोटे-मोठ्या 21 ओढ्या-नाल्यांवर 41 ठिकाणी नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, असे सर्र्वेेक्षणात स्पष्ट झाले आहे. सावेडी उपनगरातील निर्मलनगर, गावडे मळा, नालेगाव, सर्जेपुरा, रामवाडी आदी भागांमध्ये ओढ्या-नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरले होते.

याबाबत काहींनी थेट मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रारी केल्या. त्यावर मुख्यमंत्री कार्यायलाकडून तत्काळ कारवाई करा, अशा सूचना आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक बोलविली होती. त्या बैठकीला ज्येष्ठ नागरिक कृती मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.

तीन महिन्यांत ओढ्या-नाल्यांवरील पाईप काढून टाका आणि स्पॉट व्हिजिट करून अहवाल सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी महापालिकेचे सहायक नगररचनाकार, तक्रारदार शशिकांत चेंगडे व अन्य काही जण उपनगरांतील बुजविलेल्या ओढ्या-नाल्यांची स्पॉट व्हिजिट करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news