नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अग्निवीर योजना ही लष्करातील कंत्राटीपद्धत आहे, ती देशाच्या सैन्याला कमकुवत करत आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दिल्लीतील एका कार्यक्रमात तरुणांशी अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींनी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, "अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न भंगले आहे. या योजनेमुळे लष्कराचेही मनोधैर्य खचले आहे आणि सैन्य कमकुवत होत आहे. अग्निवीर योजना ही लष्करातील कंत्राटी पद्धती आहे. काँग्रेसला लष्करात कंत्राटी पद्धती नको आहे. केंद्रात सरकार आल्यास ही योजना रद्द केली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे."
राहुल गांधी म्हणाले की, "अग्निवीर योजना लष्कराच्या लोकांनी बनवली नाही. अग्निवीर योजनेचा निर्णय पंतप्रधान कार्यालयात घेण्यात आला आहे. या योजनेबाबत लष्कर आणि तरुणांना विचारले गेले नाही. अग्निवीर योजनेत पेन्शन, शहीद दर्जा आणि कॅन्टीन सुविधा मिळत नाहीत." लष्करात निवड झालेल्या दीड लाख तरुणांची नियुक्ती न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, "तरुणांचे लष्करात भरतीचे स्वप्न होते, ते स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लष्कर भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या दीड लाख तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना मार्ग सापडेल." बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, "मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून छोटे उद्योग उद्ध्वस्त केले, त्यामुळे रोजगार बंद झाला," असा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला.