टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू?

टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाला लवकरच नवीन गुरू मिळणार आहे. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा वाढीव कार्यकाळ टी-20 विश्वचषकानंतर संपुष्टात येणार असल्याने प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया नव्याने राबवण्यात येणार आहे.

टीम इंडिया 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर राहुल द्रविडचा कोचिंग कार्यकाळ संपला होता. परंतु, टी-20 विश्वचषक पाहता बोर्ड आणि द्रविड यांनी परस्पर संमतीने तो वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता 'बीसीसीआय'चे सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून, 'बीसीसीआय' लवकरच प्रशिक्षकपदासाठी जाहिरात जारी करणार आहे. परदेशी प्रशिक्षकाबाबत जय शहा म्हणाले, नवा प्रशिक्षक भारतीय की परदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही. ते 'सीएसी'वर अवलंबून असेल आणि आम्ही जागतिक संघटना आहोत. मात्र, यावेळी त्यांनी स्पष्टपणे सूचित केले की, बोर्ड वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करेल, अशी शक्यता नाही. सध्या ही प्रणाली इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि अगदी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सारख्या मंडळांनी स्वीकारली आहे.

जय शहा पुढे म्हणाले, हा निर्णयही 'सीएसी' घेणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत असे अनेक सर्व फॉरमॅट खेळाडू आहेत. शिवाय, भारतात अशा परिस्थितीचे कोणतेही उदाहरण नाही. जय शहा यांनीदेखील पुष्टी केली की, नवीन प्रशिक्षक दीर्घ कालावधीसाठी नियुक्त केला जाईल आणि तीन वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी काम करेल.

'इम्पॅक्ट प्लेयर' नियम कायमस्वरूपी नाही

'आयपीएल'मधील 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाबाबत जय शहा म्हणाले, इम्पॅक्ट प्लेयर नियम हा एक चाचणी केस होता. दोन नवीन भारतीय खेळाडूंना 'आयपीएल'मध्ये संधी मिळत आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की, हा नियम अष्टपैलू खेळाडूंच्या बाजूने नाही. ते म्हणाले, 'इम्पॅक्ट प्लेयर'च्या सातत्यबाबत निर्णय घेण्यापूर्वी आम्ही स्टेकहोल्डर्स, फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर्स यांच्याशी चर्चा करू. हा नियम कायमस्वरूपी नाही. परंतु, या नियमाविरुद्ध वरीलपैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ फक्त जूनपर्यंत

राहुल द्रविड 2021 पासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा करार यावर्षी जूनमध्ये संपत आहे. 'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, 'बीसीसीआय'चे सचिव जय शहा यांनी बुधवारी मुंबईत ही माहिती दिली. 'क्रिकबझ'ने जय शहा यांचा हवाला देत म्हटले आहे की, राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त जूनपर्यंत आहे. त्यामुळे जर त्यांना अर्ज करायचा असेल, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. कोचिंग स्टाफमधील इतर सदस्य, जसे की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, नवीन प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडले जातील. यादरम्यान जय शहा यांनी परदेशी प्रशिक्षकाची शक्यता नाकारली नाही आणि हा मुद्दा खुला सोडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news