मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; तिन्ही पक्षांत मंत्रिपदासाठी रस्सीखेच

State Cabinet Meeting
State Cabinet Meeting
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर झाल्यानंतर आता महायुतीच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात काही नव्या चेहर्‍यांना संधी देऊन महायुती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांत मंत्रिपदाचे अनेक दावेदार असून, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सत्ता असली, तरी मंत्रिमंडळात डझनभर जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मुहूर्त देऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्यात आला. अनेक महत्त्वाच्या महामंडळांवरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. विशेषत: बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मोलाची साथ देणारे काही शिलेदार तर मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. भाजपमध्येही अनेक दावेदारांना या विस्ताराची प्रतीक्षा आहे.

 शिवसेना प्रतोद भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावे आघाडीवर आहेत. गोगावले यांनी यापूर्वी आपण मंत्री आणि रायगडचा पालकमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. आता विधानसभेचा कालावधी काही महिने शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय लागल्यानंतर गोगावले यांच्यासह शिवसेनेतील मंत्रिपदाच्या दावेदारांची घालमेल सुरू झाली आहे. भाजपमध्येही आमदार संजय कुटे, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, योगेश सागर आदी नावांची आधीपासूनच चर्चा आहे, तर अजित पवार यांनाही आपल्या काही आमदारांना संधी देऊन आपल्या पक्षाला बळ द्यायचे आहे.

महामंडळ वाटपावरही तोडगा निघणार

अजित पवार हेदेखील महामंडळांच्या नियुक्त्या करण्यासाठी आग्रही आहेत. त्यावर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या समन्वय समितीत चर्चा झाली असली, तरी महामंडळ वाटपावर तोडगा निघालेला नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी महामंडळ वाटपावरही तोडगा काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news