पुढारी ऑनलाईन : हिंडेनबर्ग नंतर आता आणखी एका जागतिक स्तरावरील मीडिया संघटनेने अदानी समुहावर (Adani Group) शेअर्समध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) नावाच्या एक जागतिक मीडिया संघटनेने गौतम अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफारीचा आरोप केला आहे. ओएसएसआरपीच्या अहवालानुसार, अदानी समूहाने गुपचूपपणे स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवले आहेत. ओएसएसआरपीने हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शियल टाइम्स सोबत शेअर गेला आहे.
यात अदानी यांनी केलेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अदानी समुहातील कंपन्यांनी २०१३ ते २०१८ दरम्यान त्यांच्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले असल्याचे त्यात म्हटले आहे. ओएसएसआरपीने आरोप केला आहे की, प्रमोटर परिवाराच्या भागीदारांद्वारे मॉरिशस येथील एका निनावी गुंतवणूक निधीद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ओएसएसआरपी संघटनेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांच्यासारख्या संस्थांकडून निधी मिळतो. जॉर्ज सोरोस हे अब्जाधीश असून त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याआधी जानेवारी माहिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समुहावर फसवणूक आणि स्टॉक किंमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता. आता ओएसएसआरपी संघटनेने अदानी समुहावर गंभीर आरोप केले आहेत. याचा फटका अदानी समुहाला बसण्याची शक्यता आहे.
मल्टिपल टॅक्स हेव्हन्स आणि अदानी समुहाच्या अंतर्गत ईमेलच्या फायलींच्या आढाव्याचा हवाला देत नॉन-प्रॉफिट मीडिया संस्था OCCRP ने म्हटले आहे की, त्यांच्या तपासणीत किमान दोन प्रकरणे आढळून आली आहेत, जिथे गुंतवणूकदारांनी अशा ऑफशोर स्ट्रक्चर्सद्वारे अदानी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली.
OCCRP ने केलेल्या आरोपांवर अदानी समुहाने खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की "आम्ही हे आरोप स्पष्टपणे फेटाळतो. हे दावे एका दशकापूर्वीच्या बंद झालेल्या प्रकरणांवर आधारलेले आहेत जेव्हा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणे, संबंधित पक्षांचे व्यवहार आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या माध्यमातून झालेल्या गुंतवणुकीशी संबंधित आरोपांची चौकशी केली होती. (Adani Group)
हे ही वाचा :